जर तुम्हाला मोदी किंवा योगी स्टाइल कुर्ता खरेदी करायचा असेल तर लवकरच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. पुढील महिन्यापासून तुमच्या एका क्लिकवर अशाप्रकारची उत्पादनं उपलब्ध होणार आहेत. मथुरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एक केंद्र डझनभर नॅचरल कॉस्मेटिक्स, औषधं आणि अन्य उत्पादनं बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. अॅमेझॉनवर ही उत्पादनं उपलब्ध असणार आहेत. यामध्ये मोदी आणि योगी स्टाइल कुर्ता देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
गोमुत्र आणि शेणापासून उत्पादनं बनवण्यावर या फार्मसीचा भर असणार आहे. त्यामुळे ‘गो गुडनेस’ या नावाने ही उत्पादनं अॅमेझॉनवर उपलब्ध असतील. आरएसएसशी निगडीत दीन दयाल धाम नावाच्या एका केंद्रातून या योजनेची सुरूवात होत आहे. सुरूवातीला मोदी आणि योगी स्टाइलचे 30 कुर्ते विक्रीसाठी ठेवले जातील, अशी माहिती आहे.
याबाबत बोलताना आरएसएसचे प्रवक्ता अरुण कुमार म्हणाले की, स्थानीक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आर्थिकदष्ट्या ते सक्षम व्हावे हा यामागचा उद्देश आहे. सध्या या केंद्रातून दर महिन्याला एक लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल केअर प्रोडक्ट्स आणि तीन लाख रुपयांपर्यंतच्या कपड्यांची विक्री होते. जर ऑनलाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला तर उत्पादन वाढेल, उत्पादन वाढल्यामुळे जास्त नोकऱ्या निर्माण होतील. परिणामी, स्थानिकांना रोजगाराची जास्त संधी उपलब्ध होईल.