बिहारी विरुद्ध बाहरी या नितीशकुमार यांच्या मुद्दय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी जर बाहेरच्या असलो तर मग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कुठल्या आहेत, असा सवाल मोदींनी येथील प्रचारसभेत उपस्थित केला. दुसऱ्या देशाचा मी पंतप्रधान नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गोपालगंजमध्ये त्यांनी जंगलराजचा उल्लेख करत नितीशकुमारांवर टीका केली. ज्यांना आपल्या कामावर मते मागता येत नाहीत त्या व्यक्ती अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप मोदींनी केला. बिहार विधानसभेसाठी प्रचाराच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी मोदींनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण दुसऱ्यांना देण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी नितीशकुमारांवर केला.

Story img Loader