केंद्रीय मेत्रिमंडळाच्या विस्तारात विविध प्रकारचे आरोप असलेल्यांना स्थान दिल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची क्षमा मागावी आणि संबधित मंत्र्यांना निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी केली आहे. रविवारी तेलुगू देशम पक्षाचे वाय. एस. चौधरी, राम शंकर कटारिया यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. उभय मंत्र्यांवर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. चौधरी यांच्या मालकी असलेल्या कंपनीवर सेंट्र बँकेचे सुमारे ३१७ कोटी रुपये बुडवण्याचा आरोप आहे. तर कटारिया यांच्या नावावर २३ गुन्ह्य़ांची नोंद आहे. गुन्हेगारमुक्त राजकारणाच्या गमजा मारणाऱ्या मोदी सरकारने या मंत्र्यांना कसे काय सरकरमध्ये स्थान दिले, असा सवाल माकन यांनी उपस्थित केला.
माकन यांच्या आरोपांवर भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी व कठारिया यांच्या बचावासाठी खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली पुढे सरसावले. जेटली म्हणाले की, काँग्रेसचे आरोप निराधार आहेत. मंत्र्यांची निवड करताना अत्यंत विचारपूर्वक करण्यात आला आहे. सर्वाची पाश्र्वभूमी व विश्वासार्हता तपासून मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांची निवड केली आहे. मंत्रिमंडळ निवडताना अनेक स्तरांवर चर्चा झाली. संपुआ प्रमाणे केवळ एकाने सांगितले व मंत्री बनले असा प्रकार रालोआमध्ये नसल्याचा टोमणा जेटली यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव न घेता लगावला. उत्तर प्रदेशच्या कटारिया यांच्यावरील आरोपांचे सारे खापर जेटली यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर फोडले. केवळ कटारिया नव्हे तर उत्तर प्रदेशमधील प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांवर अखिलेश सरकारने खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा गंभीर आरोप जेटली यांनी केला. बिहारचे गिरिराजसिंह व वाय. एस. चौधरी यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. त्यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्य़ाची नोंद नाही. चौधरी प्रतिथयश उद्योजक आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी एक कंपनीचे खाते एनपीए आहे.  या कंपनीकडे बँकेचे पैसे थकित असले तरी आजतागायत संबधित कंपनी बँकेचे हप्ते फेडत असल्याचा दावा जेटली यांनी केला. खुद्द चौधरी यांनी काँग्रेचे आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Story img Loader