लखनऊ : नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय यापूर्वीच्या ६१ वर्षांवरून ५८ वर्षांवर आले आहे.
पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथील ३५ वर्षांचे खासदार निसिथ प्रामाणिक हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री असून, ७२ वर्षांचे सोम प्रकाश हे सर्वात ज्येष्ठ आहेत. सध्या मंत्रिमंडळात ७७ मंत्री आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ५० वर्षांहून कमी वयाच्या मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी (४५), किरेन रिजिजु (४९), मनसुख मंडाविया (४९), कैलाश चौधरी (४७), संजीव बालयान (४९), अनुराग ठाकूर (४६),
डॉ. भारती पवार (४२), अनुप्रिया पटेल (४०), शंतनू ठाकूर (३८), जॉन बारला (४५) व डॉ. एल. मुरुगन (४४) यांचा समावेश आहे.
नव्याने शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांचे सरासरी वय ५६ वर्षे असून, नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६१ वर्षे होते.
उत्तर प्रदेशातून ७ जणांना संधी
उत्तर प्रदेशातून ७ नवीन मंत्र्यांचा बुधवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून हे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्यांपैकी अनुप्रिया पटेल या भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दल (सोनेलाल)चा अध्यक्ष असून, पहिल्या मोदी मंत्रिमंडळात मंत्री होत्या. इतर सर्वजण भाजपचे आहेत.
११ महिला मंत्री
बुधवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सात महिला मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांची संख्या ११ झाली आहे. ही सर्वाधिक आहे. यापूर्वी २०१४ ते १९ या कार्यकाळात नऊ महिला मंत्री होत्या.