केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाकडून जुना मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेलाही संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
द इंडियन एक्सप्रेसमधील दिल्ली कॉन्फिडेंशियलच्या लेखानुसार मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक यादी आयबी म्हणजेच माहिती प्रसारण मंत्रालयाकडे देण्यात आली असून यामध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता असणाऱ्या खासदारांची नावं आहेत. महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा शिवसेनला सोबत घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडून दोन्ही काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेला मंत्रिमंडळात जागा देण्याचा विचार भाजपा करु शकते असं सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा >> केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल : मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ तीन नेत्यांना मिळू शकते संधी
शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत मागील काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका करताना दिसत नसून मोदींसदर्भात त्यांनी मवाळ भूमिका घेतल्याचं चित्र दिसत आहे. भाजपा शिवसेनेच्या पॅचअप फॅर्म्युलामध्ये उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायम ठेवून विरोधी पक्ष नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलवण्याचा विचार सुरु असल्याचीही जोरदार चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस यांच्यावर नागपूरचा म्हणजेच संघाचा वरदहस्त असू शकतो, मात्र दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेतृत्वाची त्यांच्यावर खास मर्जी नसल्याचं समजतं. भाजपा दोन उपमुख्यमंत्री पदं आणि एक प्रमुख मंत्रालय या विषयांना धरुन शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता नाकारली जात नाहीय.
सध्या राज्यामध्ये शिवसेनेच्या सदस्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. या केंद्रीय संस्थांच्या तपासाचा शिवसेनेच्या नेत्यांनी धसका घेतल्याचं चित्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातून पहायला मिळालं. तसेच दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पद आणि स्वबळावर निवडणूक लढण्यावरुन केलेल्या व्यक्तव्यांमुळे महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंतप्रधान मोदी अनेक नवीन नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करुन घेण्याची शक्यता आहे. सात जुलै रोजी यासंदर्भातील घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ५३ मंत्री आहेत. संविधानानुसार जास्तीत जास्त ८१ मंत्र्यांची नियुक्ती करता येते. या हिशोबाने सध्याच्या मंत्र्यांची संख्या पाहिल्यास आणखीन २८ मंत्र्यांना संधी दिली तर मंत्र्यांची संख्या ८१ पर्यंत जाईल.