Narendra Modi Cabinet Portfolios : तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित खासदार शिवराज सिंह चौहान यांना कृषीमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे देशाचे कृषीमंत्री अशी शिवराज सिंह चौहान यांनी नवी ओळख निर्माण झाली आहे.

हेही वाचा – शाह-गडकरींकडील जुनी खाती कायम, नड्डांकडे आरोग्य, तर शिवराज यांच्याकडे कृषी; वाचा कुणाला कुठलं मंत्रिपद?

शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून तब्बल ८ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यापूर्वी ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने त्यांचं मुख्यमंत्रिपद काढून घेत त्यांना मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी तब्बल ८ लाख १७ हजार मतांन विजय मिळवला.

दरम्यान, शिवराज सिंह यांच्या व्यक्तीरिक्त मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात अमित शाह यांना गृह विभाग, राजनाथ सिंह यांना संरक्षण, निर्मला सीतारामण यांना अर्थ, एस. जयशंकर यांना परराष्ट्र आणि नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.

याशिवाय राज्यमंत्र्यांनाही खातेवाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार, जितिन प्रसाद यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, श्रीपाद येसो नाईक यांना ऊर्जा मंत्रालय, पंकज चौधरी यांना अर्थ मंत्रालय, कृष्ण पाल यांना सहकार मंत्रालय, रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, राम नाथ ठाकूर यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, नित्यानंद राय यांना गृह मंत्रालय, तर अनुप्रिया पटेल यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.