भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात येणार आहेत, हा काँग्रेससाठी शुभशकुनच म्हणावा लागेल. कारण १९९८ च्या निवडणुकीतही ते येथील भाजपचे निवडणूक प्रमुख होते आणि त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळाला होता, अशी मल्लिनाथी करीत मध्य प्रदेश निवडणुकीतील काँग्रेसचा चेहरा असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेश भाजपकडे निवडणूक जिंकण्याबाबत आत्मविश्वास नसल्याची टीका केली.
‘लक्ष्मणरेषा’ कोणती आहे ते आपल्याला चांगले ठाऊक आहे, असे सूचित करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नाही तर निवडणुकीपुरते पक्षाचे प्रचारप्रमुख आहोत, असे स्पष्ट केले. राज्यातील निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदी येणार आहेत तर त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे. मध्य प्रदेशमधील लोकांच्या ते चांगल्या परिचयाचे आहेत. त्याचबरोबर मोदी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी गेले, मग कर्नाटक असो, हिमाचल प्रदेश असो की उत्तराखंड असो, त्या त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेत आली होती, असेही शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.