नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला उघड विरोध करणाऱ्या रालोआतील घटक पक्ष जनता दल युनायटेड या पक्षाने शुक्रवारी मोदी यांच्या एका विधानाची खिल्ली उडवली. देशातील प्रत्येकाने भारतमातेचे ऋण फेडले पाहिजे, या मोदी यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता या विधानातून त्यांची पंतप्रधान होण्याची लालसाच दिसून येते, अशी कोपरखळी या पक्षाचे सरचिटणीस शिवानंद तिवारी यांनी मारली.
भारतमातेचे प्रत्येकावर ऋण आहे, प्रत्येकाने हे ऋण फेडले पाहिजे, भारतमातेने आशीर्वाद दिल्यास हे सहज शक्य आहे, असे विधान गुरुवारी मोदी यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया विचारली असता तिवारी म्हणाले, की मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्याने अप्रत्यक्षपणे हे ऋण फेडतच आहेत. नीतिशकुमारही बिहारच्या बाबतीत ते करत आहेत. देशातील प्रत्येक जण भारतमातेचे देणे लागतो, यात नवीन काहीच नाही. ते फेडण्याची प्रत्येकाची इच्छाही असते. मात्र मोदी यांच्यासारखा राजकारणी असे विधान करतो, त्यातून वेगळा अर्थ निघतो. भारतमातेची सेवा म्हणजे पंतप्रधानपदी आरूढ होण्याची त्यांना झालेली घाई आहे. केवळ मोदीच नव्हे, तर मुलायमसिंग यांच्यासारख्या अनेक नेत्यांनीही ही महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे, मात्र पुढील वर्षी निवडणुकीनंतरच चित्र स्पष्ट होईल आणि मतदारांचा कौल कोणाला मिळाला आहे, हे लक्षात येईल, असे ते म्हणाले. मोदी यांना असलेल्या विरोधाबाबत विचारले असता तिवारी यांनी आपल्या पक्षाची भूमिका कायम असल्याचे संकेत दिले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार अद्याप निश्चित केलेला नाही, हा उमेदवार निधर्मी व समाजातील सर्व घटकांना सोबत नेणारा असावा, एवढीच आमची इच्छा आहे, असे सांगत त्यांनी मोदीविरोध कायम असल्याचे सुचविले.