राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासाच्या मुद्दय़ावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीकेची तोफ डागतानाच देशाला बदलाची अत्यंत गरज आहे, असे सांगून या सर्व मुद्दय़ांवर जाहीर चर्चा करावी, असे थेट आव्हान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंतप्रधानांना दिले. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणावर मोदी यांनी चौफेर टीका केली. पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने चिथावणीखोर वर्तन होत असताना भारताकडून त्यास ठोस प्रत्युत्तर दिले जात नसल्याबद्दलही त्यांनी पंतप्रधानांवर शरसंधान केले. दरम्यान, मोदी हे क्षुद्र राजकारणापोटीच पंतप्रधानांवर हल्ले चढवीत असल्याची टीका करून मोदी यांनी जाहीर चर्चेसाठी दिलेले आव्हान काँग्रेसने फेटाळून लावले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदी भुज येथील महाविद्यालयात बोलत होते.
‘राष्ट्रपती म्हणतात, आमच्या सहनशीलतेस मर्यादा आहेत. ही मर्यादा कोठवर आहे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा कोठे आहे,’ असे सांगत नियंत्रण रेषेचा निर्णय दिल्लीत बसलेल्या सरकारकडून व्हायला हवा. असे असताना आम्ही संयम बाळगावा, असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरते, अशी विचारणा मोदी यांनी केली. आज केवळ पाकिस्तानचीच समस्या नाही. देशाचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. चीन देशात घुसखोरी करते आणि आम्ही गप्प बसतो. इटालियन सैनिकांनी आमचे मच्छीमार मारले, पाकिस्तान्यांनी आमच्या सैनिकांचे शिरच्छेद केले, आम्ही गप्प बसतो, याकडे लक्ष वेधून आम्ही संयम किती बाळगायला हवा, याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.
पंतप्रधानांवर आज आंतराष्ट्रीय स्तरावरील काही बंधने आहेत आणि त्यापोटी शेजारी देशांशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करणे भाग पडते आणि लाल किल्ला हे काही पाकिस्तानला आव्हान देण्याचे ठिकाण नाही, हेही आपण जाणतो. मात्र लष्कराचे मनोधैर्य वाढविण्याचे काम तरी पंतप्रधानांना लाल किल्ल्यावरून निश्चितपणे करता आले असते, अशी टीका मोदी यांनी केली.

कॉँग्रेसचे टीकास्त्र
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ क्षुद्र राजकारणासाठीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करीत असून विकासासंबंधी मोदी यांनी जाहीर चर्चेसाठी दिलेला प्रस्ताव अमान्य असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. मोदी यांनी प्रथम आमचा सामना करावा, पंतप्रधान शेवटी येतील, असे आव्हान परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी दिले.