पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तुम्ही गुरु आहात.. हे वाक्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उच्चारलं आणि शरद पवार खळाळून हसले. शरद पवारांनी या संदर्भातल्या प्रश्नाला अगदी खुलून उत्तर दिलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी तुम्हाला गुरु मानतात, त्यांना तुम्ही अर्थव्यवस्था सावरण्यासंदर्भात काही सल्ला द्याल ? असा प्रश्न विचारताच शरद पवार खळाळून हसले आणि म्हणाले, ” मोदी तुम्हाला गुरु मानतात असं म्हणून तुम्ही मलाही अडचणीत आणू नका आणि मोदींनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणीही कुणाचा गुरु नसतो. सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. अलिकडे त्यांची माझी काही भेट झालेली नाही. करोनाचं संकट आल्यानंतर मोदींनी ज्या सर्वपक्षीय बैठका घेतल्या त्यामध्ये त्यांच्याशी जो संवाद झाला त्यापलिकडे त्यांचा माझा संवाद नाही. मला असं वाटतं की अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता होती. आरबीआयचे एक गव्हर्नर होते जे सोडून गेले, नेमकं काय झालं ते ठाऊक नाही. अशी माणसं किंवा डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखी माणसं यांच्याशी मोदींनी चर्चा करायला हवी. मात्र तसं करताना ते दिसत नाहीत. देशात अनेक जाणकार आहेत जे चांगला सल्ला देऊ शकतात.” असं स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडलं.

देशाला एका मनमोहन सिंग यांची गरज आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारताच शरद पवार म्हणाले, “होय १०० टक्के गरज आहे. मनमोहन सिंग ज्यावेळी आपल्या देशाचे अर्थमंत्री होते तेव्हा मी त्या मंत्रिमंडळात होतो. तेव्हाही देशापुढे आर्थिक अडचणी आल्या होत्या. अर्थव्यवस्था ढासळली होती. मात्र मनमोहन सिंग यांनी त्या संकटातून मार्ग काढला. त्यांच्या इतकंच पी.व्ही. नरसिंहराव यांचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी यासंदर्भातले निर्णय घेतले.” अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.