काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी वाचनदोषग्रस्त (डिस्लेक्सिक) आहेत, अशा  आशयाच्या वक्तव्यातून विनोद करतानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने हलकल्लोळ माजला आहे. अनेक राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ डॉक्टर आणि नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर समाज माध्यमांवरून टीकेची झोड उठवली आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले. ते म्हणतात,  ‘‘मोदी, तुमची लाज वाटते. यापेक्षा खालच्या पातळीवर तुम्ही जाऊ शकत नाही. तुमच्या मनातली असंवेदनशीलता कोणत्याही नदीत स्नान केलेत तरी धुतली जाणार नाही. ते (वाचनदोष असलेले लोक) मंदगतीने शिकतात, पण तुमच्याप्रमाणे हृदयशून्य नसतात.’’ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही, मोदी यांच्या या वक्तव्याचे वर्णन ‘लज्जास्पद आणि त्रासदायक’ अशा शब्दांत केले आहे. ते म्हणतात, ‘‘आपल्यापैकी किंवा आपल्या नात्यातल्यांपैकी कोणीही वाचनदोषग्रस्त असते. सत्तर वर्षांत प्रथमच असा असंवेदनशील व्यक्ती पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसला आहे. मोदी, हे खूप झाले. हे आहेत का आपले संस्कार?’’

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनीही, अशा प्रकारचा दर्जाहीन पंतप्रधान कुठे असेल तर तो इथे, अशी टीका केली आहे.

मूळ प्रकार काय?

स्मार्ट इंडिया हॅकथॉनमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी देहरादून येथील एका विद्यार्थिनीने, ‘वाचनदोष असलेल्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल, असा एक अभ्यासक्रम (प्रोग्राम) आपल्याकडे आहे’, असे सांगितले. तिला मध्येच थांबवत मोदी यांनी, तुमचा अभ्यासक्रम ४०-५० वयोगटातील मुलालाही उपयुक्त ठरेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला. पण मोदी तेवढय़ावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले, ‘तसे असेल तर मग त्याच्या आईलाही आनंद होईल.’ त्यांच्या या विनोदावरही हशा पिकला.

Story img Loader