बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी दिल्लीत भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांना धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून लक्ष्य केल्यानंतर २००२ साली गोध्राकांड घडले तेव्हा केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये नितीशकुमार रेल्वे मंत्रालय सांभाळत होते, याकडे लक्ष वेधून आम्हाला नितीशकुमार यांच्याकडून धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही, असा सणसणीत टोला भाजपने सोमवारी लगावला.
ज्याची धर्मनिरपेक्षता वादातीत आहे, अशा उमेदवाराचे नाव चालू वर्षांअखेर भाजपने पंतप्रधानपदासाठी जाहीर करावे, अशी जदयुने मागणी केल्यामुळे भाजपचा भडका उडाला आहे. आम्हाला देश जोडणारा पंतप्रधान हवा आहे.त्यासाठी अटलबिहारी वाजपेयींसारखे विचार असणारी व्यक्ती हवी. वाजपेयी राजधर्म पालन करण्यावर भर द्यायचे, असे रविवारी जदयुच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना नितीशकुमार यांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढविला होता. धर्मनिरपेक्षतेचा राग आळवणाऱ्या नितीशकुमार यांना चोख उत्तर देताना भाजपने मोदी-नितीशकुमार वादात अकरा वर्षांपूर्वी घडलेल्या गोध्राकांडालाच हात घातला.
२००२ साली गोध्राकांड झाले तेव्हा वाजपेयी सरकारमध्ये नितीशकुमार मंत्री होते आणि रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती, अशा शब्दात नितीशकुमार यांनी नितीशकुमारांवर हल्ला चढवला. भाजपचे सर्वच नेते धर्मनिरपेक्ष असून नितीशकुमार यांच्याकडून भाजपला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. नितीशकुमार यांनी रेल्वेमंत्री म्हणून आपली जबाबदारी नीट पार पाडली असती तर गोध्रा कांड घडलेच नसते, असा दावा करून बिहारचे आमदार व भाजपचे राष्ट्रीय सचिव रामेश्वर चौरसिया यांनी हा वाद आणखीच पेटविला.
बिहारच्या भाजप नेत्यांनी सोमवारी राजनाथ सिंह यांच्याशी भेट घेऊन जदयुच्या राष्ट्रीय परिषदेत नितीशकुमार यांनी केलेल्या भाजपला डिवचणाऱ्या वक्तव्यांवर चर्चा केली आणि प्रदेश भाजप नेत्यांच्या भावना त्यांच्यापुढे मांडल्या. बिहारमध्ये आम्हाला रालोआचे सरकार सन्मानाने चालवायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे, असे भाजपचे बिहारमधील मंत्री अश्विनी चौबे म्हणाले. याबाबत योग्यवेळी योग्य पाऊल उचलण्यात येईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटल्याचे बिहारचे भाजपनेते गिरीराज सिंह यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा