गुजरात दंगलीचा अहवाल
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ च्या दंगलप्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) बहाल केलेल्या निर्दोषत्वाविरुद्ध दाद मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले, की सत्य सोन्यासारखे चकाकत समोर आले. भगवान शंकराने जसे विषप्राशन करून ते कंठात साठवले, तसेच नरेंद्र मोदींनी याविरुद्ध एकही शब्द न काढता ही वेदना गेली १९ वर्षे निमूटपणे सहन केली.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिवंगत माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी गुजरात दंगलप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदी व इतरांना एसआयटीने बहाल केलेल्या निर्दोषत्वाविरुद्ध केलेली याचिका फेटाळली. या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी सांगितले, की लोकशाहीत राज्यघटनेचा आदर करून तिचे पालन कसे करायचे, याचा वस्तुपाठच सर्व राजकीय व्यक्तींसाठी मोदींनी घालून दिला आहे. ज्यांनी मोदींवर या प्रकरणी राजकीय स्वार्थातून आरोप केले आहेत, त्यांनी आता माफी मागावी.
शहा म्हणाले, की ज्यांनी या प्रकरणी मोदींवर आरोपांची राळ उडवली, त्यांच्यात थोडी जरी सद्सद्विवेक बुद्धी जिवंत असेल, तर ते आता मोदींची माफी मागतील. आरोप काय होते, तर या दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री मोदींसह राज्यसरकार सहभागी होते. हे आरोप राजकीयदृष्टय़ा प्रेरित होते. या काळात झालेल्या दंगली कुणी नाकारत नाही. परंतु त्यात सरकारचा सहभाग नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.
न्यायालयीन प्रक्रियेविरुद्ध कुठलीही निदर्शने समर्थनीय नाहीत. आपले म्हणणे तेव्हाच सिद्ध होते, जेव्हा न्यायव्यवस्था ते मान्य करते. मलाही कारागृहात टाकले होते. त्यावेळी मीही निर्दोष असल्याचा दावा करत होतो. परंतु जेव्हा माझ्याविरुद्ध खोटा खटला दाखल केल्याचे व केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राजकीय हेतूने माझ्याविरुद्ध कट केल्याचे न्यायालयाने मान्य केले, तेव्हा माझा दावा सिद्ध झाला, असे ते म्हणाले.
‘आम्ही निदर्शने केली नाहीत’
मोदीजींचीही अनेकदा या प्रकरणी चौकशी झाली, परंतु कोणत्याही पक्ष कार्यकर्त्यांने याविरुद्ध निदर्शने केली नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला काँग्रेसला लगावत शहा म्हणाले, की मोदीजींना सहानुभूती दर्शवण्यासाठी भाजपचे देशभरातील कार्यकर्ते जमा झाले नाहीत. आम्ही कायदेशीर प्रक्रियेला संपूर्ण सहकार्य केले. मलाही या प्रकरणी अटक झाली होती. पण आम्ही निदर्शने केली नाहीत.