केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकसत्ता डॉटकॉमच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेने गडकरींसंदर्भातील मन की बात व्यक्त केलीय. पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी हे सध्या पंतप्रधान पदी असणाऱ्या नरेंद्र मोदींपेक्षा अधिक उत्तम पर्याय असतील असं महाराष्ट्रातील जनतेचं म्हणणं आहे. लोकसत्ता डॉटकॉमच्या सर्वेक्षणामध्ये साडे अकरा हजारांहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं असून त्यापैकी ५४ टक्क्यांहून अधिक लोकांनी गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींपेक्षा सरस ठरतील असं मत नोंदवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानदी आपली सात वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यास येत्या रविवारी सात वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल वाचकांचं मत जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमने २५ आणि २६ मे रोजी सर्वेक्षण घेतलं. या सर्वेक्षणामध्ये तब्बल ११ हजार ५१४ लोकांनी आपलं मत नोंदवलं.

याच सर्वेक्षणामध्ये ‘तुमच्या मते भाजपाचा कुठला नेता पंतप्रधान म्हणून सर्वोत्कृष्ट आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर उत्तर देताना ५४.७ टक्के म्हणजेच ११,५१४ जणांपैकी ६ हजार ३०० जणांनी गडकरी हे सर्वोत्तम निवड असल्याचं मत नोंदवलं. त्या खालोखाल ३२.३ टक्के वाचकांनी नरेंद्र मोदी तर ०.७ टक्के वाचकांनी अमित शाह योग्य ठरतील असं मत व्यक्त केलं. मोदींना ३ हजार ७१९ जणांनी पसंती दिली तर शाह यांना केवळ ७७ जणांनी मत दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे गडकरी, मोदी, शाह यांच्यापैकी कोणताही नेता योग्य नसल्याचं मत नोंदवणाऱ्यांची संख्या १२.३ टक्के होती. एक हजार ४१८ जणांनी या तिघांपैकी कोणताही भाजपाचा नेता पंतप्रधान म्हणून चांगला नसल्याचं मत नोंदवलं.

याच सर्वेक्षणामध्ये मोदी आणि शाह यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या नरेंद्र मोदी व अमित शाह हे दोघेच सरकार चालवतात व अन्य नेत्यांना फारसं महत्त्वाचं स्थान नाही हा आरोप पटतो का?, या प्रश्नाला उत्तर देताना ६४.६ टक्के वाचकांनी हा आरोप योग्य असल्याचं मत नोंदवलं आहे. ११,५१४ जणांपैकी ७ हजार ४३३ जणांनी होय मोदी आणि शाह दोघेच सरकार चालवतात आणि अन्य नेत्यांनी फारसं महत्वाचं स्थान नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. या प्रश्नावर नाही मत नोंदवण्याची टक्केवारी ३३ (३ हजार ८०१ मतं) तर तटस्थ म्हणून मत नोंदवणाऱ्यांची संख्या २.४ टक्के (२८० मतं) इतकी आहे.

नक्की वाचा >> भाजपा न सोडण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळाली प्रेरणा; गडकरींनी सांगितला किस्सा

सर्वेक्षणामध्ये करोनासंदर्भातील प्रश्नांवर जनतेने मोदी सरकार व्यवस्थापनामध्ये अपयशी ठरल्याचंही मत नोंदवलं असून करोना नियोजनामध्ये केंद्र सरकारच्या कमावरील नाराजी उघडपणे व्यक्त केलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi government 2nd term survey people chose nitin gadkari as better pm candidate than modi scsg