पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना मोदी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. उद्या (गरुवार) सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांना देखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.

भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज ३५ पैशांनी महाग होत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी ८ रुपयांनी वाढ झाली आहे.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते. जे संपूर्ण भारतात एकसमान आहे. मात्र यावर आकारले जाणारे व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर देशात सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. त्यामुळे केंद्राने राज्यांना देखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.

उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अर्थ मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलने १०० रुपयांचा पल्ला गाठला आहे. काही शहरात तर पेट्रोलने ११० रुपयांची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईही वाढली आहे.

Story img Loader