माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा प्रश्न
भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली असतानाच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी राजन यांची पाठराखण करताना केंद्र सरकारवरच हल्ला चढविला आहे. रघुराम राजन हे जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांची गव्हर्नर पदावर नियुक्ती करण्याची केंद्र सरकारचीच पात्रता आहे का, असा सवाल चिदम्बरम यांनी केला आहे.
रघुराम राजन यांना मुदतवाढ द्यावी का, असा प्रश्न विचारण्यात आला असता चिदम्बरम त्वरेने म्हणाले की, राजन यांची या पदावर नियुक्ती करण्याची मुळातच केंद्र सरकारची पात्रता आहे का? राजन यांची गव्हर्नरपदाची मुदत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संपुष्टात येत आहे.
केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वार्ताहरांशी संवाद साधताना चिदम्बरम यांनी प्रथम, डॉ. स्वामी यांनी राजन यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. पंतप्रधान अथवा अर्थमंत्र्यांनी राजन यांच्याविरोधात वक्तव्य केले तर काँग्रेस पक्ष त्याची दखल घेईल, असे प्रथम ते म्हणाले.
यूपीए सरकारने रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञाची नियुक्ती केली, आम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखविला आणि यापुढेही तो कायम राहील, असे चिदम्बरम म्हणाले. राजन यांनी व्याजदराबाबत घेतलेल्या भूमिकेवर अर्थमंत्री म्हणून तुम्हालाही काही खटकत होते का, असे विचारले असता चिदम्बरम म्हणाले की, सर्व मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्ससोबत यूपीए सरकारचे उत्तम संबंध होते आणि त्यामध्ये विद्यमान गव्हर्नरचाही समावेश आहे. सरकारचा वृद्धीचा दृष्टिकोन असतो तर मध्यवर्ती बँकेचा दृष्टिकोन आर्थिक स्थैर्य असतो, असेही चिदम्बरम म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा