आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसंच एम. एस. स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनाही पुरस्कार जाहीर झाला. काँग्रेसने या निर्णयाचं कौतुक केलं आहे. मात्र ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा मोदी सरकारला विसर पडल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी एक पोस्ट लिहून मोदी सरकारवर टीका केली.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले…आधी दोन आणि आता एकदम तीन असे एका महिन्यात पाच नेत्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले…पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त तीन भारतरत्न देता येतात. मोदींनी एका महिन्यात पाच जणांना भारत रत्न जाहीर केले… निवडणुकांची धामधूम.दुसरे काय?
कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग.पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्न ने सन्मानित केले….आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत.पण मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला…ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहळा करू शकले. असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी ही पोस्ट करण्यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपण बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारस आहोत त्या नात्याने ही मागणी करतो आहोत की बाळासाहेब ठाकरे यांना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा. अशी एक पोस्ट लिहून मागणी केली आहे. पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.