१५ नोव्हेंबरपासून अर्धा टक्का उपकर लागू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी आता अर्धा टक्का स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे विमान प्रवास, दूरध्वनीवरील संभाषण, हॉटेलांतील जेवण आणि बँकिंग सेवा आदी महाग होणार आहे. या निर्णयामुळे केंद्राच्या तिजोरीत चार हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आवश्यकता भासल्यास सर्वच किंवा विशिष्ट सेवांवर दोन टक्के स्वच्छ भारत उपकर लागू करण्याचे संकेत दिले होते. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने परिपत्रक जारी करत सर्व करपात्र सेवांवर अर्धा टक्का उपकर लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. स्वच्छ भारत उपकर हा अन्य कोणताही अतिरिक्त कर नसून प्रत्येक भारतीयाला स्वच्छ भारत अभियानात योगदान देता यावे म्हणून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच या उपकराच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्वच्छ भारत अभियानासाठीच वापरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उपकराची आकारणी..
* विद्यमान सेवाकराच्या व्यतिरिक्त हा कर असेल. विद्यमान सेवा कर १४ टक्के आहे
* अर्धा टक्का उपकर सर्व करपात्र सेवांवर लागू असेल
* १०० रुपयांना ५० पैसे उपकर असे त्याचे प्रमाण असेल