देशभरात जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षकांना केंद्र सरकारने छुपं प्रोत्साहन दिल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केला. गेल्या ७० वर्षात देशात अशी घटना घडली नव्हती. पण मोदी सरकारच्या काळात या घटना घडू लागल्याची टीकाही त्यांनी केली.

देशातील विविध राज्यांमध्ये जमावाकडून मारहाण तसेच हत्या केल्याची घटना समोर आली होती. यावरुन लोकसभेत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या ७० वर्षात देशात अशा स्वरुपाच्या घटना घडली नव्हती. भाजपशी संबंधीत संघटनांचा या घटनांशी संबंध आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचा हल्ल्यांशी संबंध असल्याचे समोर आले. पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोप खरगेंनी केला. मध्य प्रदेश, झारखंड हे राज्य जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचे केंद्र बनल्याची टीका त्यांनी केली. देशात दलित, अल्पसंख्याक आणि महिलांची हत्या होत असून भाजप या मारेकऱ्यांचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशभरात आता दहशत आणि भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. खरगे यांच्या विधानावर भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी आक्षेप घेतला. खरगेंनी ज्या घटना सांगितल्या, त्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे असे दुबेंनी सांगितले. तर केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनीदेखील खरगेंच्या आरोपांवर उत्तर दिले. खरगेंनी ज्या राज्यांचा उल्लेख केला तिथे पोलिसांनी आरोपींवर कारवाई केल्याचे अनंतकुमार यांनी सांगितले.

भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनीदेखील चर्चेत सहभाग घेतला. मोदींनी या घटनांचा निषेध दर्शवला आहे. आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्र सरकार दरवेळी निमलष्करी दलाची तुकडी पाठवू शकत नाही असे यादव यांनी सांगितले.
दुसरीकडे राज्यसभेतही काँग्रेसने गुजरातच्या मुदुद्यावरुन भाजपची कोंडी केली. गुजरातमध्ये घोडेबाजार सुरू असून भाजप काँग्रेसचे आमदार विकत घेत असल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळे कामकाज काही वेळेसाठी तहकूब करावे लागले.

Story img Loader