काश्मिरी हिंदू स्थलांतरितांना वडिलोपार्जित मालमत्ता या दहशतवादी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोडून पळून जावे लागले होते. आता त्या मालमत्ता पुन्हा मिळवून देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे आणि आतापर्यंत काही जणांना मालमत्ता मूळ मालकांना परत देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बुधवारी राज्यसभेत देण्यात आली.
आतापर्यंत एकूण ९ काश्मिरी पंडितांना काश्मीरमधील त्यांची मालमत्ता परत देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली आहे. हे काश्मिरी पंडित त्या मालमत्तेचे मूळ मालक आहेत तेथील हिंसाचारानंतर पळून गेले होते. राज्यसभेत याबाबत माहिती देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचारानंतर काश्मीर सोडून गेलेल्या त्या सर्व काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सरकार या स्थलांतरित काश्मिरी हिंदूंना त्यांची मालमत्ता परत मिळवून देत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यांतील स्थलांतरित काश्मिरींच्या मालमत्तेचे कायदेशीर संरक्षक संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी आहेत.
सरकारने सांगितले आहे की जर कोणी या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले तर जिल्हाधिकारी त्यावर कायदेशीर कारवाई करतील. आता काश्मिरी पंडित आपली जमीन परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. केंद्र सरकारच्या मते, आतापर्यंत ९ काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये त्यांची संपत्ती परत मिळाली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
सरकारने सांगितले की जम्मू-काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कलम ३७० रद्द केल्यापासून एकूण ५२० स्थलांतरित लोक काश्मीरमध्ये परतले आहेत. जेणेकरून त्यांना पंतप्रधान विकास पॅकेज -२०१५ अंतर्गत तेथे नोकरी मिळू शकेल. १९८९-९० मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशदवाद्यांच्या वाढीमुळे त्यांना आपले घर सोडावे लागले. २०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांच्या घरी परतण्याची आशा होती.