देशात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यापुर्वी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे महत्वाचे आहे. मात्र लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लशीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, दिल्लीत अनेक लसीकरण केंद्रे लशीअभावी बंद झाली आहेत. त्यामुळे काँग्रेस मोदी सरकारच्या लस धोरणावर सतत प्रश्न उपस्थित करत आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट व्दारे ‘जबाबदार कोण?’ असे लिहित काही प्रश्न उपस्थित केले. “आता लशीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लशीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत” अशी परिस्थिती भारतात असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या.
प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘आज, भारताच्या १३० कोटी लोकसंख्येपैकी केवळ ११% लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ ३ % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण ८३% घटले. आज मोदी सरकारने देशाला लशीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लशीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?’
“करोनाच्या सुरवातीपासूनच करोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लशीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तेसच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे.”, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांनी मोदींना विचारलेले तीन प्रश्न
- सरकारची गेल्या वर्षी लसीकरणाची संपूर्ण योजना तयार होती, मग जानेवारी २०२१ मध्ये केवळ १ कोटी ६० लाख लशी का मागवल्या गेल्या?
- सरकारने देशात कमी लशी देऊन परदेशात अधिक लशी का पाठविल्या?
- जगातील सर्वात मोठा लस उत्पादक भारत आज इतर देशांकडून लस मागवण्याच्या स्थितीत का आहे आणि हे निर्लज्य सरकार यात यश मिळाल्यासारखे भासवण्याचा प्रयत्न का करीत आहे?