मोदी सरकारने आपल्या पहिल्या वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचारविरोधी संस्थांमध्ये भ्रष्ट लोकांना नियुक्त करण्याचा प्रयत्न केला असून शैक्षणिक संस्थांचे भगवेकरण करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी रविवारी येथे केला. प्रशांत भूषण यांची अलीकडेच आम आदमी पार्टीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. येथे आयोजित ‘स्वराज अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीच्या मुद्दय़ावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. या आयुक्तांची नियुक्ती पुढे ढकलण्यात आली आहे, परंतु या आयोगावर भ्रष्ट लोकांनाच नियुक्त करण्याचा घाट मोदी सरकारने घातला असल्याची टीका प्रशांत भूषण यांनी केली. ‘यूजीसी’, ‘एनसीईआरटी’, ‘आयसीएचआर’ यांसारख्या संस्थांचे भगवेकरण करण्याचेही सरकारकडून प्रयत्न होत असल्याची आपली माहिती आहे, असे प्रशांत भूषण म्हणाले.
देशाला अंधश्रद्धांकडे नेणाऱ्या लोकांच्या नियुक्त्या करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपले म्हणणे स्पष्ट करताना प्रशांत भूषण यांनी मनुष्यबळ विकासमंत्र्यांचे उदाहरण दिले. या बाई ज्योतिष्याकडे जाऊन आपला हात दाखवितात आणि आपण राष्ट्रपती कधी होणार आहोत, याची विचारणा करतात, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली.
केंद्रीय माहिती आयोगातही रिक्त जागा भरल्या जात नाहीत आणि त्यामुळे देशातील नागरिकांना पंतप्रधानांच्या कार्यालयासंबंधी माहिती मिळत नाही, याकडे भूषण यांनी लक्ष वेधले. मात्र, मागील यूपीए सरकारप्रमाणेच वर्षभरात सरकारचे कोणतेही घोटाळे उघडकीस आले नसल्याचे सांगून प्रशांत भूषण यांनी सरकारचे काहीसे कौतुकही केले.

Story img Loader