Mallikarjun Kharge Attacks PM Modi On X : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार टीका करत, त्यांनी आर्थिक गोंधळ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. या गोंधळामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे, असेही ते म्हणाले.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएवर टीका करताना खरगे म्हणाले की, “या अर्थिक गोंधळावर मोदी सरकारकडे कोणताही उपाय नाही. या आर्थिक गोंधळाला तोंड देण्यासाठी मोदी सरकार कुचकामी ठरले आहे.”
आपल्या एक्स पोस्टच्या शेवटी मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावत म्हटले की, “नरेंद्र मोदी जी, तुमचा नव वर्षाचा संकल्प प्रत्येक नागरिकाचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या जुमलांपेक्षा काही कमी नाही!”
मल्लिकार्जून खरगेंचे आरोप
आपल्या पोस्टमध्ये मल्लिकार्जून खरगे यांनी ७ आर्थिक निर्देशांकांचा दाखला दिला आहे. ते म्हणाले, “सुवर्ण कर्जामध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य गेल्या ८ तिमाहीत मंद झाले असून, कार विक्री ४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. गेल्या ५ वर्षांत अभियांत्रिकी, उत्पादन, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वेतन केवळ ०.८ टक्के वार्षिक दराने वाढले आहे. गेल्या आठ तिमाहीत अन्नधान्य महागाई सरासरी ७.१ टक्के आहे. याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी कर आकारणीमुळे घरगुती बचत कमी होत आहे. रुपयाने सर्वकालीन नीचांकी पातळी गाठल्यामुळे परदेशी निधीचा प्रवाह मंदावला असून, छोट्या गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.”
हे ही वाचा : Mamata Banerjee : घुसखोरीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे BSFकडे बोट; केंद्र सरकारवरही केले गंभीर आरोप
अधिवेशनातही खरगेंनी पंतप्रधानांना घेरले
संसदेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. हे अधिवेशन विविध मुद्यांनी गाजले होते. याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाजही स्थगित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशना दरम्यान संसदेत विविध मुद्द्यांवर भाषण करत काँग्रेस आणि गांधी परिवारावर टीका केली होती.
यावर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले होते. राज्यसभेत बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुद्दे खोडून काढले होते. खरगे यांच्या राज्यसभेतील या १३ मिनिटांच्या भाषणाचा व्हिडिओही काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर शेअर केला होता.