मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (६२) यांनी गुजरातमध्ये दिमाखात हॅटट्रीक साधत स्वतचे राजकीय स्थान आणखी बळकट केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हा राज्यातील सलग पाचवा विजय. या पक्षाला २००७ मधील कामगिरीची पुनरावृत्ती मात्र करता आली नाही. त्या वेळच्या ११७ जागांपेक्षा दोन जागा कमी मिळाल्या. कॉंग्रेसच्या जागांमध्ये दोनने वाढ होऊन त्या ६१ झाल्या.
ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पक्षाला अवघ्या तीन जागाच जिंकता आल्या. त्यांच्या पक्षाचा आधी बराच गाजावाजा झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसची एक जागा या वेळी कमी झाली. त्यांचे दोन उमेदवार विजयी झाले.
प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांचा पोरबंदरमध्ये झालेला पराभव कॉंग्रेससाठी धक्कादायक ठरला. विरोधी पक्षनेते शक्तिसिंह गोहील हेदेखील मत्स्योत्पादन मंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांच्याकडून भावनगरमध्ये पराभूत झाले. कॉंग्रेसच्या राज्यातील प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणारे शंकरसिंह वाघेना हे मात्र कापडवंजमध्ये यशस्वी ठरले.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडाप्रधान?
* गुजरातच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर मोदी यांचे जन्मगाव वडानगरमध्येही उत्साहाचा माहोल आहे. मुस्लीमबहुल वस्तीतील मोदी यांच्या घरातच नव्हे तर वस्तीत आणि अख्ख्या गावभर विजयाचा जल्लोष होत आहे. मोदी या देशाचे वडाप्रधान अर्थात पंतप्रधान बनावेत, अशीच इच्छा अनेक गावकरी बोलून दाखवत आहेत. मोदींनी गुजरातचा विकास केला तसाच ते देशाचाही विकास करतील, असे गावकऱ्यांना वाटते.
* आपल्या मुलाच्या विजयाचा आईला अपार आनंद झाला आहे. मोदींच्या विजयानंतर त्यांच्या आईला पत्रकारांनी व दूरचित्रवाहिन्यांनी घेरले तेव्हा त्या म्हणाल्या की, तो या देशाचा पंतप्रधान बनेल, याची मला खात्री आहे. तो गुजरातचा सुपुत्र आहे त्यामुळे गुजरात त्याच्या पाठिशी कायम राहील.
* विजयानंतर  मोदी प्रथम आईला भेटले आणि त्यानंतर ते तडक केशुभाई पटेल यांच्या घरी गेल्याने त्यांच्या विरोधकांना तसेच समर्थकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. केशुभाईंनी गुजरात परिवर्तन पक्ष काढून मोदींविरोधात या निवडणुकीत दंड थोपटले होते. प्रचारातही त्यांनी मोदींविरोधात कडवी टीका केली होती. असे असताना मोदी केशुभाईंकडे गेले आणि त्यांनी परस्परांना मिठाई खिलविली तेव्हा केशुभाईंच्या घरातलेही भारावले होते. मोदी निघून गेल्यानंतर पत्रकारांनी पराभवाबाबत केशुभाईंना छेडले तेव्हा ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर पत्रकारपरिषदेत काय ते बोलेन, आत्ता नाही, एवढेच ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi gujrats narendra