पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पसमांदा मुस्लीम समुदायाच्या विकासावर भाष्य केलं. तसेच त्यांनी समान नागरी कायद्याचं महत्त्व पटवून दिलं. यावेळी त्यांनी तिहेरी तलाकवरही भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणावरून AIMIM चे अध्यक्ष असुदूद्दीन ओवैसी यांनी निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक, समान नागरी कायदा आणि पसमांदा मुसलमानांवर टिप्पणी केली आहे. असं वाटतंय की ओबामा यांनी दिलेला सल्ला मोदींना व्यवस्थित समजला नसावा”, असं ओवैसी म्हणाले.

“भारताच्या विविधतेला आणि एकतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी समस्या समजतात. वन नेशन, वन इलेक्शन, वन टॅक्स, वन लॉ, वन कल्चर, वन रिलिजन आणि आता वन फर्टिलायजरबाबतही बोलत आहेत. ही त्यांची खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे भारताच्या पंतप्रधांनाना आर्टिकल २९ समजत नाही. समान नागरी कायद्याबाबत मोदी बोलत आहेत. समान नागरी कायद्यामुळे तुम्ही विविधेतील एकतेला हिसकावणार आहात का? पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्याबाबत बोलत नसून ते हिंदू सिव्हिल कोडबाबत बोलत आहेत. मी मोदींना आव्हान देतो की, तुम्ही हिंदू अविभाजित कुटुंबांना बरखास्त करू शकता का?”, असा हल्लाबोल औवेसी यांनी केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे समजावून सांगणे आवश्यक आहे की अनुच्छेद २९ हा एक अधिकार आहे. संविधान धर्मनिरपेक्ष आहे. इस्लाममध्ये विवाह एक करार आहे. परंतु, हिंदूंच्या बाबतीत ही गोष्टी जन्मा-जन्माची असते”, असंही औवेसी म्हणाले.

“पाकिस्तानचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की पाकिस्तानात तीन तलाकवर बंदी आहे. पण मोदींना पाकिस्तानाच्या कायद्यामधून एवढी प्रेरणा का मिळाली? तुम्ही तर येथे तीन तलाक विरोधात कायदाही तयार केला आहे. परंतु, त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. शिवाय, महिलांवरील अत्याचार अधिक वाढले. कायद्याने समाजात सुधारणा होणार नाहीत. जर कायदा बनवायचाच असेल तर त्या पुरुषांविरोधात बनवा जे लग्नानंतरही आपल्या बायकोला सोडून फरार होतात”, असा टोलाही ओवैसींनी लगावला.

मोदींच्या भाषणानंतर ओवैसी यांनी एक ट्वीटही केलं होतं. त्यात म्हणाले की, “मोदीजी मला सांगा, तुम्ही “हिंदू अविभक्त कुटुंब” (HUF) संपवाल का? कारण यामुळे देशाला दरवर्षी ₹३०६४ कोटींचे नुकसान होत आहे. एकीकडे तुम्ही पसमांदा मुस्लिमांसाठी मगरीचे अश्रू ढाळताय आणि दुसरीकडे तुमचे प्यादे त्यांच्या मशिदींवर हल्ले करत आहेत, त्यांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत, त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवत आहेत, त्यांना लिंचिंगद्वारे मारत आहेत आणि त्यांच्या आरक्षणाला विरोधही करत आहेत. तुमच्या सरकारने गरीब मुस्लिमांची शिष्यवृत्तीही रद्द केली आहे, असंही ओवैसी म्हणाले. पसमंदा मुस्लिमांचे शोषण होत असेल तर तुम्ही काय करत आहात? पसमंदा मुस्लिमांची मते मागण्यापूर्वी तुमच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन माफी मागावी, तुमच्या प्रवक्त्याने आणि आमदाराने आमच्या नबी-ए-करीमच्या गौरवाविषयी अपमान केला आहे, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi hints at uniform civil code owaisi teases issue of hindu undivided family challenging the prime minister sgk