‘राजकारणातले मला काही कळत नाही. तुम्ही मला चित्रपटांसंदर्भात प्रश्न विचारा, त्याची उत्तरे मी तुम्हाला देऊ शकेल.. पण राजकारणावरील प्रश्नांना उत्तरे दिली तर मीच जाळ्यात अडकेल..’ असे सांगत प्रख्यात अभिनेता सलमान खान याने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्यासंदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र, त्याचवेळी मोदींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छाही त्याने व्यक्त केली.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी सलमानला खास गुजरात सरकारनेच निमंत्रित केले होते.
मंगळवारी सलमान येथे आला, त्याने त्याच्या  ‘जय हो’ या आगामी चित्रपटासाठी प्रचारही केला. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींबरोबर भोजनाचा आस्वादही घेतला आणि पतंगबाजीही केली. यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या गराडय़ात सलमानने मोदींच्या नेतृत्वगुणांविषयी तुफान स्तुती केली. मात्र, त्यांना पंतप्रधानपदासाठी थेट पाठिंबा असल्याच्या मुद्दय़ावर त्याने सोयिस्कर मौनच बाळगले. पत्रकारांनी वारंवार छेडले असतानाही त्याने या प्रश्नावर अखेपर्यंत त्यांना झुलवतच ठेवले.
पत्रकारांच्या प्रश्नांना सलमान उत्तरे देत असताना त्याच्या बाजूलाच उभे असलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाबाबतच्या प्रश्नाला सलमानने दिलेल्या उत्तरावेळी स्मितहास्य केले. त्याच्याबरोबर पतंग उडवण्याचा आनंदही लुटला.

प्रिया दत्त, बाबा सिद्दिकीच माझे नेते
नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार काय, या प्रश्नावर बोलताना सलमानने आपल्याला राजकारणातले काही कळत नसल्याचे सांगितले. आपण गुजरातमध्ये नव्हे तर वांद्रे येथ राहतो, त्यामुळे तेथील काँग्रेसचे खासदार बाबा सिद्दिकी आणि प्रिया दत्त हेच आपले नेते असल्याचे सलमाननने स्पष्ट केले. मात्र, गुजरातमध्ये मोदींनी केलेल्या विकासकामांची स्तुती करताना त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची सदिच्छाही सलमानने यावेळी व्यक्त केली.

 

Story img Loader