नवी दिल्ली : राज्यसभेत निरोपाचे भाषण करताना माझ्या डोळय़ातील पाणी मोदींनी माझे कौतुक केले म्हणून नव्हते. त्या वेळी मोदींच्या डोळय़ातील अश्रूही माझ्यासाठी नव्हते. मला वाटत होते की, मोदींना पाश नाहीत. ते कशाला इतके संवेदनशील होतील? पण, त्यांनी निदान मानवता तरी दाखवली’’, असे नमूद करत गुलाम नबी आझाद आझाद यांनी टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उत्तर दिले आहे.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर मत व्यक्त केले. आझाद यांना मोदींबद्दल सहानुभूती असल्याची टीका काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती. त्यामागे राज्यसभेतील आझाद आणि मोदींचा भावुक प्रसंग असल्याचे कारण सांगितले जाते. ‘‘मोदींचे फक्त नाव घेतले जाते, माझ्याविरोधात (राहुल गांधी यांनी) भूमिका घेण्यामागे २३ नेत्यांनी सोनियांना लिहिलेले पत्र कारणीभूत आहे. आम्ही पत्र लिहिलेच कसे, असे त्यांना (गांधी कुटुंबाला) वाटते. कायदा लागू होत नाही अशा उच्चस्थानी आपण असल्याचे त्यांना वाटते’’, अशी टीका आझाद यांनी केली.
दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येच्या हृदयद्रावक प्रसंगाची आठवण निघाल्याने आम्ही दोघेही भावुक झालो होतो, असे सांगत ‘’एखादी व्यक्ती निरक्षर कशी असू शकते’’, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली. ‘‘मी जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री असताना २००६ मध्ये गुजरातमधून आलेल्या चार पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने मोदींनी मला फोन केला होता पण, मी हमसून हमसून रडत होतो. त्यानंतर ते सतत फोन करत राहिले. पर्यटकांचे पार्थिव गुजरातला पाठवले तेव्हाही विमानतळावर मला रडू आवरले नाही. हा प्रसंग त्यांनी टीव्हीवर पाहिला असावा. मोदींनी पुन्हा मला फोन केला, तेव्हा ते इतके भावुक झाले होते की, त्यांनाही बोलता येत नव्हते’’, अशी आठवण आझाद यांनी सांगितली.
मोदींनी मानवता तरी दाखवली!
‘‘मला वाटत होते की, मोदींना पाश नाहीत, त्यांना बायको-मुले नाहीत. ते कशाला इतके संवेदनशील होतील? पण, त्यांनी निदान मानवता तरी दाखवली’’, असे आझाद म्हणाले. ‘‘मी जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री असताना २००६ मध्ये गुजरातमधून आलेल्या चार पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. तो प्रसंगच हृदयद्रावक होता. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने मोदींनी मला फोन केला होता पण, मी हमसून हमसून रडत होतो. मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. माझ्या रडण्याचा आवाज त्यांनी फोनवरून ऐकला. त्यानंतर ते सतत फोन करत राहिले. पर्यटकांचे पार्थिव गुजरातला पाठवले तेव्हाही विमानतळावर मला रडू आवरले नाही. हा प्रसंग त्यांनी टीव्हीवर पाहिला असावा. मोदींनी पुन्हा मला फोन केला, तेव्हा ते इतके भावुक झाले होते की, त्यांनाही बोलता येत नव्हते’’, अशी आठवण आझाद यांनी सांगितली. हा प्रसंग आठवून राज्यसभेत मोदींच्या डोळय़ात अश्रू आले होते. त्यावरून काँग्रेस पक्षातील अनेक जण मला टोमणे मारत आहेत. पण, मोदींना राहुल गांधींनी मिठी मारली होती. त्यावर काँग्रेसनेते अवाक्षरही काढत नाहीत, असे आझाद म्हणाले.
‘काँग्रेस सोडायला भाग पाडले!’
गेली चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत राहिलेले आझाद यांनी आपल्याला पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले, असा दावा केला. सोनियांना आम्ही पाठवलेल्या पत्रामध्ये अनेक सूचना केल्या होत्या. कार्यकारिणीच्या अनेक बैठका झाल्या पण, आमची एकही सूचना स्वीकारली गेली नाही, अशी टीका आझाद यांनी केली.