PM Narendra Modi in Russia Update : रशिया-युक्रेनच्या युद्धात रशियन सैन्यासाठी लढणाऱ्या सर्व भारतीयांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को दौऱ्यातदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी या सैन्यांच्या परतण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त सूत्रांच्या अहवालाने न्यूज १८ ने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. २०१९ मध्ये ते शेवटचे रशियाला गेले होते. त्यानंतर २०२२मध्ये उझबेकिस्तानमधील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत व्लादिमिर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांची शेवटची भेट झाली होती.
युक्रेन-रशियन युद्धात चार भारतीयांचा मृत्यू
युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात भारतीयांची दुर्दशा झाली आहे. गेल्या काही महिन्यांत नोकरीच्या आमिषाने भारतीयांची फसवणूक केल्याच्या धक्कादायक बातम्याही समोर आल्या आहेत. भारतीयांना फसवून त्यांना रशियन सैन्यासाठी लढायला भाग पाडले आहे. यामध्ये अडकलेल्या एका तरुणाने व्हिडिओ करून याप्रकरणात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. आतापर्यंत या युद्धात चार भारतीय मारले गेले आहेत, तर १० जण देशात परतले आहेत. तर अजूनही ३५-४० भारतीय रशियात अडकले असल्याचे वृत्त आहे.
भारतीयांना सोडवण्यासाठी अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी म्हटले आहे की दलालांमार्फत फसवलेल्या लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की हा मुद्दा भारतासाठी चिंतेचा आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून रशियाबरोबर चर्चा सुरू आहे.
संघर्षाच्या परिस्थितीत रशियन सैन्यात भारतीय नागरिकांची भरती ही भारत-रशिया राजनैतिक भागीदारीशी सुसंगत नसल्याची भूमिका भारताने कायम ठेवली आहे. अशा सर्व भारतीय नागरिकांची लवकर सुटका करण्याची विनंती करण्यात आली होती. भविष्यात अशा नोकरभरती थांबवण्याची मागणीही भारताने केली आहे. अश्विनभाई मांगुकिया आणि मोहम्मद अस्फान (दोघेही गुजरातचे) या दोन भारतीयांचा या वर्षाच्या सुरुवातीला युक्रेन युद्धात मृत्यू झाल्याची नोंद आहे. जूनमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
व्लादिमिर आणि मोदी यांची भेट
पंतप्रधान मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून ते सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले. त्यानंतर ते पुतिन यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. पुतिन आणि मोदी यांनी गळाभेटही घेतली. व्लादिमीर पुतिन म्हणाले, सर्वप्रथम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मला वाटतं की हा विजय काही योगायोग नाही. हा निकाल तुमच्या सरकारच्या अनेक वर्षांच्या कामाची पोचपावती आहे. देशातील जनतेसाठी भल्यासाठी काय करायला हवं, याची जाणीव तुम्हाला आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य देशातील जनतेसाठी समर्पित केलं आहे आणि भारतातील जनतेलाही याची जाणीव आहे.
© IE Online Media Services (P) Ltd