नरेंद्र मोदी हे तर सैतान असून, त्यांना पंतप्रधानपद मिळाल्यास देशाचे भविष्य अंधकारमय असेल, या अत्यंत कडव्या शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून गेल्या काही दिवसांपासून परस्परांवर जोरदार टीका करण्यात येते आहे.
बॅनर्जी यांनी काढलेल्या चित्राच्या विक्रीबाबत प्रश्न उपस्थित करणारे मोदी यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा तृणमूल कॉंग्रेसने दिला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा बॅनर्जी यांनी मोदीवर घणाघाती टीका केली.
बॅनर्जी म्हणाल्या, मोदी हे तर सैतान आहेत. गुजरातमधील दंगलींचे तेच ‘शिल्पकार’ आहेत. आता त्यांनी आपले लक्ष पश्चिम बंगालकडे वळवले आहे. त्यांना राज्यातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडायची आहे, असाही आरोप बॅनर्जी यांनी केला.
मोदी यांना राजकारणात राहण्याचा कोणताच हक्क नाही, असे सांगून गुजरातमध्ये दंगल घडवून आणणाऱयांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नये, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader