काँग्रेस नेते शशी थरुर हे कधी आपल्या इंग्रजीमुळे तर कधी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ या आपल्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत असलेल्या थरुर यांनी असेच आणखी एक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील एका खास  सूत्राच्या हवाल्याने थरुर यांनी म्हटले आहे. त्या सूत्राने एका पत्रकाराला हे सांगितले होते. या पत्रकाराचा उल्लेख थरुर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

बेंगळुरु लिट फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या थरुर यांनी आपल्याच पुस्तकातील काही पाने उपस्थितांसमोर वाचून दाखवली. ते म्हणाले, आरएसएसमधील एका सूत्राने याचा एका पत्रकारासमोर उल्लेख केला होता. मी त्याचा संदर्भ माझ्या पुस्तकात दिला आहे. मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारुही शकत नाही.

थरुर यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींवर तिखट शब्दांत टीका केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदी हे ईशान्य भारतातील विचित्र आणि हास्यास्पद टोपी परिधान करतात. पण मुस्लिमांची टोपी घालण्यास नकार देतात. भाजपाने हा ईशान्य भारतातील लोकांचा अवमान असल्याचे म्हटले होते. नुकतेच त्यांनी मोदींवर लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख करताना आपल्या ट्विटमध्ये ‘floccinaucinihilipilification’ या शब्दाचा वापर केला होता. बेकार या अर्थाने या शब्दाचा वापर केला जातो.

Story img Loader