स्वत:चाच प्रसार-प्रचार करण्यासाठी राज्याच्या तिजोरीतील कोटय़वधी रुपयांचा वापर करून राष्ट्रीय नेतृत्व करण्याची मनीषा नरेंद्र मोदी हे बाळगत असतील, तर तो त्यांचा निव्वळ भ्रम आहे, असा प्रतिटोला काँग्रेसने रविवारी नरेंद्र मोदी यांना मारला. त्याअगोदर भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी पक्षातर्फे मोदींवर हल्ला करताना हे भाष्य केले.
गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत काँग्रेस विरोधात बोलताना जी भाषा वापरली ती निश्चितच योग्य नव्हती. त्यांच्या या वक्तव्यातूनच राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यास ते अपात्र आहेत, हेच सिद्ध होते.  राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारून राष्ट्रीय नेतृत्वाची पात्रता प्राप्त करता येत नाही, अशा शब्दांत शुक्ला यांनी मोदी यांना सुनावले.मोदींनी काँग्रेस संबंधात केलेले वक्तव्य म्हणजे खोटेपणाचा कळस आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मोदी यांचे प्रणव मुखर्जी यांना समर्थन होते तर त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा का दर्शविला नाही? रालोआतील शिवसेना आणि नितीशकुमार यांनी देखील मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. मुखर्जी तुम्हाला प्रिय नव्हते तेव्हा तुम्ही पी.ए. संगमा यांचे गुणगान करीत होतात, हे योग्य आहे काय? याचा अर्थ तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहू शकत नाही, असाच होतो ना?त्याअगोदर मोदी यांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या परिषदेत बोलताना प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान पदासाठी डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा योग्य उमेदवार होते, मात्र मुखर्जी हे त्या पदावर यशस्वी ठरल्यास गांधी घराण्याचे काय होणार, असा प्रश्न काँग्रेसला पडला. त्यांनी हे पद काँग्रेस घराण्यासाठीच राखून ठेवण्यासाठी त्यावेळी त्या पदावर ‘रात्रीचा पहारेकरी’ ठेवला आहे, असे वक्तव्य डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव न घेता केले.
काँग्रेस प्रवक्ते यांनी यासंबंधात बोलताना, डॉ. मनमोहन सिंग हे काँग्रेसचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले गेले पाहिजे. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे आणि तो राखला गेला पाहिजे!