समीर जावळे, भुसावळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपला अभिनंदन जेव्हा पाकिस्तानच्या ताब्यात होता, तेव्हा  सगळा देश अभिनंदनच्या पाठिशी उभा राहिला. सगळा देश प्रश्न विचारू लागला की अभिनंदनला कधी सोडणार? तो परत कधी येणार? तो सुखरूप येणार की नाही? त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी चिडले होते. की आता सगळा देश मला विचारतो आहे अभिनंदन कधी परतणार? मोदी पंतप्रधान आहेत की कसाई? असा प्रश्न विचारत भुसावळमधल्या सभेत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. रावेरचे बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर आणि जळगावच्या बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर या दोघांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मोदी म्हणतात मी कधीही खोटं बोलत नाही. तसंच पाकिस्तानचं F16 हे विमान पाडल्याचं कुणाला कौतुक नाही, जर मोदी खोटं बोलत नाहीत तर अमेरिकेने हा दावा कसा काय केला की, आम्ही पाकिस्तानला दिलेली सगळी F16 विमानं शाबूत आहेत. जर मोदी खोटं बोलत नाहीत तर काय अमेरिका खोटं बोलते आहे का? मोदी कायम हे पण सांगत आले आहेत की मी मागासवर्गीय आहे. एकदा नरेंद्र मोदींनी त्यांचं एखादं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तरी दाखवावा असंही आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. वंचित आघाडीने जे दोन उमेदवार रावेर आणि जळगावमध्ये दिले आहेत ते समाजासाठी काम करणारे आहेत. ते श्रीमंत घरातून आलेले नाहीत असेही सांगितले तसेच त्यांना निवडून द्या असेही आवाहन केले.

प्रकाश आंबेडकर बोलत असताना त्यांना ऐकण्यासाठी भुसावळच्या स्टेशन परिसरात असलेल्या मैदानावर तुडुंब गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा विषय जेव्हा आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात केला तेव्हा चौकीदार चोर है या घोषणाही देण्यात आल्या. या उपस्थितांना प्रश्न विचारला असता आमचं मत बाळासाहेब आंबेडकरांनाच असंच उत्तर बहुतांश गर्दीतल्या लोकांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिलं. एकंदरीत रक्षा खडसे आणि उन्मेश पाटील या दोघांसाठीही ही निवडणूक सोपी नाही हे दाखवणारीच ही सभा होती.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi is the prime minister or the butcher asks prakash ambedkar in bhusaval