नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालातून ‘मोदींची हमी’नेच (मोदीं की गॅरेंटी) लोकांना प्रभावित केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
काही राजकीय पक्षांना खोटय़ा-फोल घोषणा करून काहीही लाभ होणार नाही हे समजतच नाही. निवडणुका जिंकण्यापूर्वी नागरिकांची मने जिंकणे आवश्यक असते. त्यांच्या बुद्धिमत्तेस कमी लेखणे योग्य नाही, असे मतही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. ‘विकास भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
विरोधी पक्षांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले, की त्यांनी स्वार्थाऐवजी सेवाभावनेस सर्वोच्च प्राधान्य दिले असते, तर देशातील बहुसंख्य नागरिक गरिबी, संकटे आणि दु:ख भोगत जगले नसते. आमचे सरकार ‘माय-बाप’ सरकार नाही, तर माता-पित्यांची सेवा करणारे सरकार आहे. मूल ज्याप्रमाणे आई-वडिलांची सेवा करते, त्याचप्रमाणे हा मोदी तुमची सेवा करतो. ज्यांची कोणी पर्वा केली नाही, ज्यांच्यासाठी कार्यालयांचे दरवाजे बंद असत, अशा गरीब आणि वंचितांची मला काळजी आहे. मी त्यांची फक्त काळजी घेत नाही तर त्यांची पूजा करतो. माझ्यासाठी प्रत्येक गरीब व्यक्ती अतिमहत्त्वाची (व्हीआयपी) आहे. प्रत्येक आई, मुलगी, बहीण, शेतकरी, तरुण ‘व्हीआयपी’ आहे.
हेही वाचा >>> ओडिशात प्राप्तिकर विभागाची कारवाई तीव्र; रोख रकमेच्या आणखी २० पिशव्या जप्त
मोदी म्हणाले, की देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांची अजूनही खूप चर्चा होत आहे. या निकालांनी ‘मोदींची हमी’ योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदींच्या ‘गॅरंटी’वर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदारांचा मी ऋणी आहे. ‘विकास भारत संकल्प यात्रा’ हे गरजूंपर्यंत पोहोचण्याचे एक उत्तम माध्यम असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, अगदी कमी कालावधीत सव्वा कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत ‘मोदी गॅरंटी’ वाहन पोहोचले आहे आणि त्यांनी त्याचे स्वागत केले आहे. त्यांनी याला सक्रिय प्रतिसाद देत या उपक्रमास यशस्वी करण्यास हातभार लावला आहे.
हजारो लाभार्थी सहभागी
या कार्यक्रमात देशभरातून ‘विकास भारत संकल्प यात्रे’चे हजारो लाभार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. देशभरातील दोन हजारांहून अधिक वाहने, हजारो कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) आणि सामान्य सेवा केंद्रही (सीएससी) यावेळी सहभागी झाले होते. तसेच केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवून प्रमुख योजनांचे उद्दिष्ट गाठण्याच्या उद्देशाने ‘विकास भारत संकल्प यात्रा’ सुरू करण्यात आली आहे.
लोकांची मने जिंकणे महत्त्वाचे
आम्हाला विरोध करणाऱ्यांवर देश विश्वास का ठेवत नाही, हा खरा प्रश्न असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, की काही राजकीय पक्षांना खोटय़ा-फोल घोषणा करून काही साध्य होणार नाही, हे समजतच नाही. समाजमाध्यमांत झळकून नव्हे तर जनतेत मिसळून, जनतेची मने जिंकून निवडणुका जिंकल्या जातात.