सुषमा स्वराज या नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा भाजपसाठी पंतप्रधानपदाच्या चांगल्या उमेदवार आहेत, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे कल्पनांचा अभाव आहे. ते काँग्रेसची घोषवाक्ये ते चोरतात असा आरोप केला. सुषमाजी, मोदींना जरा इतिहासाचे धडे द्या, असा शहाजोग सल्लाही त्यांनी दिला आहे.
दिग्विजय सिंग हे सुद्धा राहुल गांधी यांच्यापेक्षा काँग्रेससाठी पंतप्रधानपदाचे चांगले उमेदवार आहेत, या सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यावर त्यांना धन्यवाद देऊन दिग्विजय सिंग म्हणाले, की आपण मोदी यांना कल्पना रम्यतेत रमणारे खोटारडे नेते असे म्हटलो होतो. सुषमाजी, त्यांना इतिहासाचे काही धडे द्या, असे दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
मोदी यांच्यावर टीका करताना दिग्विजयसिंग यांनी काल असे म्हटले होते, की सुषमा स्वराज यांच्यासारख्या नेत्या असताना भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले याचे आश्चर्य वाटते. त्यावर गमतीने सुषमा स्वराज यांनीही लगेच ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या, की दिग्विजयसिंगजी तुम्हीसुद्धा राहुल गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून चांगले उमेदवार आहात.
गेल्या वर्षीही दिग्विजय सिंग यांनी सुषमा स्वराज याच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत असे म्हटले होते, त्यावर भाजपने दिग्विजय सिंग यांची भांडणे लावण्याची सवय जुनीच असल्याचे म्हटले होते. दिग्विजय यांचा मोदींना विरोध आहे, त्यांनी म्हटले आहे, की मोदींकडे नवीन कल्पना नाहीत व ते काँग्रेसची घोषवाक्ये चोरतात. त्यांनी १९७१ मध्ये काँग्रेसने मांडलेली ‘गरिबी हटाव’ची संकल्पना चोरली. गुजरातमध्ये दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांची संख्या का वाढली, ते मोदी यांनी सांगावे असे दिग्विजय सिंग यांनी मोदी यांच्या पाटण्यातील सभेच्या अगोदर ट्विट केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा