पंतप्रधानपदासाठीचे भाजपचे उमेदवार म्हणून आघाडीवर असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षेला कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सुरुंग लावला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे ‘स्टार प्रचारक’ म्हणून कर्नाटकात काही महत्त्वाच्या ठिकाणी मोदींनी सभा घेतल्या. मात्र, त्या भागातही काँग्रेसनेच सरशी साधल्याचे दिसून आले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मोदींनी कर्नाटक किनारपट्टी आणि बंगळुरू या भागांत तीन सभा घेतल्या होत्या. मात्र या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.बंगळुरू शहरात नरेंद्र मोदी यांच्या ‘विकास मंत्रा’चाही प्रभाव पडलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठी साथ देणाऱ्या बंगळुरू महानगराने यावेळी मात्र चांगलेच ठोकरले असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. या वेळी बंगळुरू शहरी भागात भाजपला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बंगळुरू शहरातील मद्य पुरविणाऱ्या हॉटेलांची मुदत रात्री एकपर्यंत वाढविण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु या आश्वासनाचाही फारसा प्रभाव पडलेला नाही.
याखेरीज, बंगळुरू शहरातील घनकचरा, त्याची विल्हेवाट आदी मुद्दे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये गेल्या वर्षी मुख्य मथळ्याचा विषय ठरले होते. या नाजूक मुद्दय़ावर समाधानकारक तोडगा काढण्यात भाजपचे स्थानिक नेते अपयशी ठरले आणि हा मुद्दाही भाजपच्या विरोधात गेला.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते के. सिद्दरामय्या यांनी ‘मोदींची जादू फसली’ अशी टीका केली. ‘राहुल गांधी फॅक्टर काँग्रेससाठी निश्चितच महत्त्वाचा ठरला. मात्र, मोदींची जादू फसली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि संघाच्या माणसांना कर्नाटक कधीच मान्य करणार नाही,’ असे ते म्हणाले.