भारताच्या आमंत्रणाला मान देऊन नव्या सरकारच्या शपथविधीला हजर राहिलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दोन्ही देशांच्या संबंधावर चर्चा केली. मात्र, सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत अपेक्षेप्रमाणे फार काही हाती लागले नाही. परस्पर सहकार्याची ग्वाही देतानाच दोन्ही देशांतील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
भारताच्या १५व्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंगळवारी मोदींनी त्यांच्या शपथविधीसाठी हजर राहिलेल्या ‘सार्क’ राष्ट्रांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे त्यांनी शरीफ यांची भेट घेतली. या वेळी परराष्ट्रामंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग आदी उपस्थित होते.
सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीतील चर्चेबाबत भारताच्या परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पाकिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर न होऊ देण्याच्या आश्वासनाचे पालन पाकिस्तानने करावे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. मुंबई हल्ल्याची जी सुनावणी पाकिस्तानात सुरू आहे त्याला गती देऊन संबंधितांना शिक्षा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाल्याचे सिंग यांनी सांगितले. दोन्ही देशांतील संबंध अधिक सुधारावेत, यासाठी परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा सुरूच ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला. सप्टेंबर २०१२मध्ये आखण्यात आलेल्या राजकीय आणि आर्थिक आराखडय़ानुसार दोन्ही देशांतील व्यापार संबंध सुरळीत व्हावेत, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.
मोदी पाकिस्तानला जाणार?
मोदींना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण देण्यात आले काय, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, निमंत्रण त्यांनी दिले आहे. आम्ही ते स्वीकारले आहे पण अजून कुठल्याही तारखा ठरवलेल्या नाहीत. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा मुद्दा चर्चेत आला का, अशी विचारणा केली असता, ‘त्यावर सांगता येणार नाही,’ एवढेच उत्तर सिंग यांनी दिले.
आमची आजची भेट दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक संधी ठरावी. आम्ही दोघेही (दोन्ही सरकारे) कार्यकाळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. त्यामुळे भारत-पाक संबंधांबाबत जनतेच्या मनात असलेल्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची योग्य संधी आम्हाला लाभली आहे. गेली अनेक दशकांपासून् असलेली अस्थिरता आणि असुरक्षितता या प्रदेशातून हद्दपार केले पाहिजे.
– नवाझ शरीफ, पाकिस्तानचे पंतप्रधान