पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रामधून नव्यानेच संधी देण्यात आलेल्या खासदारांमध्ये डॉ. भारती पवार यांनीही बुधवारी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारच्या शपथविधीनंतर गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. भारती पवार यांनी आरोग्यमंत्री पदावरुन उचलबांगडी झालेल्या डॉ. हर्ष वर्धन यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

सध्याच्या करोना परिस्थिच्या पार्श्वभूमीवर एएनआयशी डॉ. भारती पवार यांनी संवाद साधला. “महाराष्ट्राला करोनाचा मोठा फटका बसला असून तिथे आता नवा डेल्टा व्हेरिएंटही आढळून आलाय. केरळमध्येही करोना रुग्णांची संख्या वाढलीय. एकाकडे रुग्णसंख्या कामी होत असतानाच या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे,” असं डॉ. भारती पवार म्हणाल्या.

पुढे बोलताना डॉ. भारती पवार यांनी भाजपाच्या विरोधकांवर निशाणा साधला. “लसीकरणाच्या बाबतीत भारताने जगात अव्वल स्थान मिळवल्याचं यश विरोधकांना पहावलं नसेल. आज भारत (औषधे आणि लसींची) इतरांकडून मदत मिळेल या आशेवर नसून तो इतरांना पुरवठा कऱणारा देश झालाय, त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाले असतील,” असा टोला डॉ. भारती पवार यांनी लगावला आहे.

मंत्रीमंडळ विस्तराच्या आधीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावरुन काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत हे करोना परिस्थिती संभाळण्यात अपयश आल्याचं चिन्ह असल्याची टीका केली. मात्र डॉ. भारती पवार यांनी मागील दोन वर्षांमध्ये हर्ष वर्धन यांनी आरोग्यमंत्री म्हणून चांगलं काम केल्याचं म्हटलं आहे. “माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मागील दोन वर्षात चांगलं काम केलं. प्रत्येक सरकारमध्ये बदल होत असतात. डॉ. हर्ष वर्धन यांच्या कामामुळे पडलेला परिणाम आपण पाहिला आहे. त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली,” असं डॉ. भारती पवार म्हणाल्यात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये व्यापक आणि कठोर फेरबदल करताना १२ मंत्र्यांची हकालपट्टी केली. आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक या बड्या मंत्र्यांचीही गच्छंती झाली.

दुसऱ्या लाटेतील गैरव्यवस्थापन व हाताळणीवरून टिकेचे धनी झालेले डॉ. हर्षवर्धन यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. वास्तविक करोनासंदर्भातील सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जात आहेत. पण, एकेकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे हर्ष वर्धन यांच्या राजीनाम्यामुळे आरोग्य मंत्रालयाची पुनर्रचनेवर मंत्रीमंडळातील नवीन सदस्यांची घोषणा होण्याआधीच शिक्कामोर्बत करण्यात आलं. हर्ष वर्धन यांच्याकडील आरोग्यमंत्रालय हे गुजरातच्या मनसुख मंडावियांकडे देण्यात आलं आहे.

Story img Loader