आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-रालोआच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून उभा दावा मांडणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज, गुरुवारी दिल्लीत आमनेसामने येतील. बाराव्या पंचवार्षिक योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मोदी आणि नितीशकुमार मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने गुरुवारी नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल होत असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही राजकीय वर्तुळात त्यांच्या दिल्लीवरील स्वारीकडे उत्सुकतेने बघितले जात आहे. पण त्यांच्या मार्गात अडथळे आणू पाहणारे नितीशकुमारही दिल्लीत उपस्थित असतील. मोदी यांच्या उमेदवारीला भाजप-रालोआचा घटक पक्ष असलेल्या नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडने जाहीर विरोध केला आहे. या विरोधामुळेच रालोआतील सर्व घटक पक्षांचे नेते मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित असताना नितीशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिष्कार घातला होता. गुजरातमध्ये विजयांची हॅट्ट्रिक नोंदविल्याबद्दल नितीशकुमार यांनी मोदी यांचे अभिनंदनही केले नव्हते, तर आज अहमदाबादमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी मोदींनीही नितीशकुमार यांना निमंत्रण दिले नव्हते.
गुरुवारी दिवसभर चालणाऱ्या राष्ट्रीय विकास परिषदेत २०१२ ते २०१७ दरम्यान अमलात आणावयाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यालाही मंजुरी मिळणार आहे. हे निमित्त साधून मोदी आणि नितीशकुमार केंद्रातील मनमोहन सिंग सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडणार नाही. अर्थव्यवस्थेला आलेल्या अवकळेच्या मुद्दय़ावरून मोदी काँग्रेस-यूपीएला लक्ष्य करतील, तर बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी थंडबस्त्यात टाकल्याबद्दल नितीशकुमार केंद्रावर हल्ला चढवतील. भाजप-रालोआमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून पेटलेल्या शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर मोदी आणि नितीशकुमार या बैठकीत एकमेकांना कसे प्रतिसाद देतात याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असेल. उद्या, राष्ट्रीय विकास परिषदेतील चकमक आटोपल्यानंतर दुपारी भाजपच्या मुख्यालयात नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.
मोदी, नितीशकुमार, जयललिता आणि नवीन पटनाईक या विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या आक्रमणाची धार बोथट करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय विकास परिषदेची फेररचना करून त्यात कमलनाथ, गुलामनबी आझाद आणि अश्विनीकुमार या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला येण्याची शक्यता धूसर आहे. अर्थकारणात आलेल्या सुस्तीमुळे बाराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान आर्थिक विकास दराचे लक्ष्य ८.२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय नियोजन आयोगाच्या वतीने मांडण्यात येणार आहे. मात्र, सुमारे ४८ लाख कोटी रुपयांच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याऐवजी मोदी आणि नितीशकुमार काय आतषबाजी करतात, याकडेच साऱ्या नजरा रोखलेल्या असतील.
मोदी-नितीशकुमार आज दिल्लीत आमनेसामने
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-रालोआच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून उभा दावा मांडणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज, गुरुवारी दिल्लीत आमनेसामने येतील. बाराव्या पंचवार्षिक योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मोदी आणि नितीशकुमार मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
First published on: 27-12-2012 at 03:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi niteshkumar head on in delhi today