मॉस्को : ‘‘रशिया आणि युक्रेनदरम्यानचा प्रश्न युद्धभूमीवर सुटू शकणार नाही’’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान नि:संदिग्धपणे सांगितले. क्रेमलिनमध्ये भारत-रशिया शिखर परिषदेला सुरुवात करताना मोदी यांनी युक्रेन युद्धावरून भारताची भूमिका स्पष्ट केली. बॉम्ब, बंदुका आणि बुलेट यामध्ये शांतता चर्चा यशस्वी होत नाहीत असे ते यावेळी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी यांच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. पुतिन यांच्याबरोबरची चर्चा फलदायी असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही वर्षांमध्ये भारताला अन्न, इंधन आणि खतांचा तुटवडा होणार नाही यासाठी भारत-रशिया सहकार्याचा फायदा झाला अशी प्रशंसा मोदी यांनी केली. तर, मोदी यांनी युक्रेन प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पुतिन यांनी त्यांचे आभार मानले.

रशियाने फेब्रुवारी २०२२मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. या आठवड्याच्या शेवटी वॉशिंग्टनमध्ये ‘नाटो’ परिषद होत असताना, मोदींच्या रशिया भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ‘‘रशियाने युक्रेन युद्धाबद्दल काहीही ठराव मांडण्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचा आदर करत युक्रेनच्या प्रादेशिक अखंडता, युक्रेनची स्वायत्तता विचारात घेतली पाहिजे, असे भारताने रशियाला स्पष्ट करावे’’, अशी अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी मंगळवारी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

हेही वाचा >>> दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम; हेलिकॉप्टरसह मानवरहीत हवाई पाळत

पंतप्रधान मोदी सोमवारी रशियाला पोहोचत असतानाच, काहीच वेळापूर्वी रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील काही इमारतींसह लहान मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्या संदर्भात द्विपक्षीय शिखर परिषदेदरम्यान मोदी म्हणाले की, निष्पाप मुलांचा मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा आणि अतिशय वेदनादायक असतो. भारत शांततेच्या बाजूने आहे आणि चर्चेच्या मार्गानेच संघर्षाचे निवारण केले पाहिजे या भूमिकेबाबत त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आश्वस्त केले. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, रशियाचे क्षेपणास्त्र युक्रेनमधील लहान मुलांच्या रुग्णालयाला लक्ष्य करत असताना पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष पुतिन यांची गळाभेट घेतल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. आपली नाराजी त्यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली आहे.

भारतीयांच्या सुटकेस रशिया अनुकूल

रशियाच्या सैन्यामध्ये सहाय्यक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सर्व भारतीयांची सुटका करण्याचे आणि त्यांचे प्रत्यार्पण करण्याचे रशियाने व्यापकपणे मान्य केले आहे. अनेक भारतीय तरुणांना नोकरी किंवा शिक्षणाचे प्रलोभन दाखवून रशियाला पाठवण्यात आले होते, प्रत्यक्षात त्यांना युद्धादरम्यान रशियन सैन्यासाठी सहाय्यक कर्मचारी म्हणून काम करण्यास भाग पाडण्यात आले होते. या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात होती.

मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

पंतप्रधान मोदी यांना मंगळवारी ‘ऑर्डर ऑफ सेंट अँर्ड्यू द अपोसल’ हा रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अध्यक्ष पुतिन यांनी, क्रेमलिनमधील सेंट अँर्ड्यू सभागृहात एका विशेष सोहळ्यात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला

तुम्ही सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी आभारी आहे. विशेषत: युक्रेन समस्या सोडवण्यासाठी मुख्यत: शांततेच्या माध्यमातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी आभारी आहे. – व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया

रशियाच्या क्षेपणास्त्राने युक्रेनमधील लहान मुलांच्या सर्वात मोठ्या रुग्णालयावर हल्ला करून कर्करोगाच्या लहान रुग्णांना लक्ष्य केले. याच दिवशी जगातील सर्वात मोठ्या लोकहाशीच्या नेत्याने मॉस्कोमध्ये सर्वात मोठ्या गुन्हेगाराला मिठी मारणे हे प्रचंड निराशादायक आहे आणि शांतता प्रयत्नांना बसलेला मोठा धक्का आहे.- वोलोदिमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

नवीन पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता सर्वात महत्त्वाची आहे. युद्धभूमीवर प्रश्न सुटणे शक्य नाही. बॉम्ब, बंदुका आणि बुलेट यामध्ये शांतता चर्चा यशस्वी होऊ शकत नाही. प्राणहानी झाल्यास मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला वेदना होतात. त्यातही निष्पाप मुलांची हत्या होणे हृदय पिळवटून टाकणारे आणि अतिशय वेदनादायक असते. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi putin summit pm modi tells russian president vladimir putin war cannot solve problems zws