भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे रविवारी महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत.  या दौ-यात त्यांनी अमरावती, अकोला आणि नांदेड येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी राहुल गांधी, शरद पवार, अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. गुजरातच्या विकासाचा फुगा फुटेल, असे राहुल गांधी सांगतात. त्याकरिता महाराष्ट्राच्या मॉडेलचा हवाला ते देतात. या निवडणुका गुजरातच्या मुद्यावर लढविल्या जात नाही. देशांतर्गत विकासाचा विचार या निवडणुकीसाठी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी ६० वर्षांत कॉंग्रेसने काय केले, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असे आव्हान मोदींनी केले.  अशोक चव्हाणांना तिकीट देणे हा निर्लज्जपणा आहे. अशोक चव्हाणांना तिकीट देणं ही कारवाई आहे का? असा सवालही यावेळी त्यांनी राहुल गांधींना केला. आदर्शमधील शहीद कुटुंबीयांची घर काँग्रेसने लाटली आहेत, सत्ता आल्यास आदर्श घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्राचे आहेत. पण राज्याच्या शेतक-यांची पिछेहाट झाली असून शेतकरी आत्महत्या करत आहे. या आत्महत्या रोखण्यात आघाडी सरकार अपयशी ठरले. क्रिकेटविषयी बोलणारे कृषीमंत्री शेतक-यांच्या आत्महत्याविषयी काहीच बोलत नाही हे राज्याचे दुर्दैव असल्याचे मोदींनी सांगितले. कापूस निर्यातीवर निर्बंध आणून शरद पवारांनी शेतक-यांचे नुकसान केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात अनेक सभा घेणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अखेर आज अमरावतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. किंबहुना, बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाडाव करा, असे आवाहनही केले.