२००२मध्ये झालेल्या गुजरात दंगलींच्यावेळी गुजरात सरकारने कोणतीही चुकीची गोष्ट केली नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकानेही माझे निदरेषत्व मान्य केले आहे, असे सांगत गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या दंगलीबाबत आपली भूमिका मांडली. ‘मी हिंदू राष्ट्रवादी आहे’ असेही मोदी यांनी ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ठामपणे सांगितले.
भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख झाल्यानंतर गांधीनगर येथील निवासस्थानी त्यांची ही मुलाखत घेण्यात आली. २००२च्या दंगली हीच तुमची ओळख अनेक लोकांना वाटत आले आहे, त्यामुळे नैराश्य येत नाही काय, असे विचारले असता ते म्हणाले, की जर काही चुकीचे केले असते तर अपराधीपणा वाटला असता. आपण चोरी करीत होतो आणि पकडले गेलो असे असते तेव्हा नैराश्य येते. माझ्याबाबतीत तशी परिस्थिती नाही.
गुजरातमध्ये तेव्हा जे घडले त्याबाबत खेद वाटतो का? असे विचारले असता ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने विशेष चौकशी पथक नेमले होते त्यांनी माझे निदरेषत्व मान्य केले आहे. दुसरी बाब म्हणजे जर तुम्ही स्वत: मोटार चालवत असाल किंवा दुसरा कुणीतरी मोटार चालवत आहे आणि तुम्ही मागे बसला आहात अशा स्थितीमध्ये जेव्हा एखादे कुत्र्याचे पिलू चाकाखाली येते तेव्हा तेवढेच दु:ख होते. मी मुख्यमंत्री असो वा नसो यापेक्षा एक मनुष्य म्हणून एखादी वाईट घटना घडल्यास त्याचे दु:ख वाटणे स्वाभाविक आहे.
तुम्ही २००२ मध्ये जे केले ते योग्य होते का, या प्रश्नावर ते म्हणाले, खचितच. आपल्याला मोठी मेंदूची शक्ती देवाने दिली आहे. त्याशिवाय मोठा अनुभवही गाठीशी होता. त्या परिस्थितीत जे शक्य होते ते केले.
विरोधी पक्षांतून संताप
मोदींनी २००२ दंगलीतील मनुष्यहानीबाबत बोलताना ‘कुत्र्याच्या पिल्ला’चे उदाहरण दिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र संताप उसळला आहे. मोदी यांनी या विधानाद्वारे मुस्लिमांची तुलना कुत्र्याशी केली, असा आरोप करत काँग्रेस, माकप, भाकप आणि जेडीयू या पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच मोदींनी यासाठी देशाची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाला प्राधान्य
*नरेंद्र मोदींची नवी व्याख्या * गुजरातच्या यशात सर्वाचा वाटा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे चाहते जितके आहेत तितकेच टीकाकार. एखाद्या मुद्दय़ावर मोदींचे काय मत आहे याची उत्सुकता आहे. भाजपने मोदींना प्रचारप्रमुख केल्यावर वादळ निर्माण झाले. गुजरात दंगलीपासून ते भविष्यकालीन योजनांबाबत मोदींना काय वाटते याबाबत मनमोकळेपणे दिलेली उत्तरे.
*२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी जनता तुम्हालाच दोष देत आहे?
भारत हा लोकशाही देश असल्याने जनतेला टीका करण्याचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची मते असतात, त्याप्रमाणे जनता टीका करीत आहे. मात्र मी जर काही चुकीचे केले असेल, तर त्याबद्दल मला नक्कीच वाईट वाटेल. ‘मी दोषी आहे,’ असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा चिंता अधिक वाढते. मात्र मला असे वाटत नाही.
*म्हणजे जे काही झाले, त्याबाबत खेद वाटतोय?
भारताचे सर्वोच्च न्यायालय हे जगातील सवरेत्कृष्ट न्यायालयांपैकी एक आहे. गुजरात दंगलींची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होते. देशातील अत्यंत उच्च अधिकारी या पथकात होते. या पथकाच्या अहवालात मला निर्दोष ठरवण्यात आले आहे. समजा, मी कार चालवीत आहे आणि माझ्या गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले, तर मला वाईट वाटणारच. समजा, माझा चालक गाडी चालवत असेल आणि मी गाडीच्या मागील सीटवर बसलो असेन, तरी मला वाईट वाटणारच. त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय, त्याबद्दल वाईट वाटत आहे.
* पण तुमच्या सरकारने दंगल वेगळ्या प्रकारे हाताळली?
मला वाटते की, आम्ही योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले असून त्यासाठी संपूर्ण शक्ती कामाला लावली.
* तुम्हाला काय वाटते, २००२ मध्ये तुमच्या सरकारने जे काही केले ते योग्यच होते?
अर्थात. हे प्रकरण हाताळण्यासाठी आम्ही संपूर्ण शक्ती आणि बुद्धिमत्तेचा वापर केला. मी परिस्थिती कशी हाताळली याची चौकशीही एसआयटीने केली आहे.
*भारताला धर्मनिरपेक्ष नेतृत्वाची गरज आहे, असे तुम्हाला वाटते का?
होय. मात्र धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ काय, हे समजून घेतले पाहिजे. माझ्या मते, धर्मनिरपेक्ष म्हणजे, भारताला सर्वोच्च प्राधान्य. ‘सर्वाना समान न्याय, कुणालाही दुखवू नये’ हेच माझ्या पक्षाचे तत्त्व आहे. आमच्यासाठी हे तत्त्वच धर्मनिरपेक्षता आहे.
*टीकाकार म्हणतात, तुम्ही सत्तापिपासू नेते आहात, समर्थक म्हणतात, तुम्ही योग्य निर्णय घेणारे नेते आहात; यापैकी मोदींचे नेमके नेतृत्व कोणते?
तुम्ही जर स्वत:ला नेते समजत असाल, तर तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. योग्य निर्णय घेता आला, तरच तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळते. योग्य निर्णय घेणाऱ्या व्यक्तीलाच जनता आपला नेता म्हणून निवड करते. हा दुर्गुण नसून एक चांगला गुण आहे. दुसरी गोष्टी म्हणजे, जर एखादा नेता सत्तापिपासू आहे, तर तो इतकी वष्रे सरकार कसे चालवू शकतो? सांघिक प्रयत्नांशिवाय तुम्ही यश कसे मिळवू शकता? गुजरातने जे यश मिळवले आहे, ते मोदींचे यश नाही, तर ‘टीम गुजरात’चे यश आहे.
*तुमच्यावर टीका करू नये, यासाठी टीकाकारांना काय सल्ला द्याल?
टीका आणि आरोप या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. टीका करताना, तुमच्याकडे परिपूर्ण व वास्तववादी माहिती असणे आवश्यक असते, संशोधन करून तुम्ही ही माहिती मिळवली पाहिजे, कुठलेही परिश्रम करण्याची ज्याची तयारी नसते, तो आरोप करण्याचा सोपा मार्ग निवडतो. लोकशाहीत आरोप करून कोणीही परिस्थिती बदलू शकत नाही. त्यामुळे मी आरोपांच्या विरोधात आहे. मात्र टीकांचे मी स्वागत करतो.
*मुस्लिमांसह अल्पसंख्याकांनी तुम्हाला मते द्यावीत, यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
सर्वप्रथम हिंदुस्थानच्या नागरिकांमध्ये हिंदू आणि मुस्लीम अशी फूट मी पाडू शकत नाही. मी हिंदू व शीख किंवा हिंदू व ख्रिस्ती अशी फूट पाडणार नाही. सर्व मतदार हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे यांसारख्या विषयावर मी माझे मत मांडू इच्छित नाही, ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. लोकशाही प्रक्रियेत तुम्ही धर्माचा वापर करू शकत नाही.
*तुम्ही जर पंतप्रधान झालात, तर कोणत्या नेत्याचे अनुकरण कराल?
माझे जीवनच एक तत्त्वज्ञान असल्याने मी कोणाचे अनुकरण करणार? कुणासारखे बनावे, असे माझे स्वप्न कधीच नव्हते. काहीतरी करावे, हेच माझे स्वप्न आहे. दिल्लीत सर्वोच्च पद मिळावे, अशी माझी कोणतीच अपेक्षा नाही. जर अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून मला काही तरी शिकायला मिळाले तर मी गुजरातचा आणखी विकास करू शकेन. सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्याकडून मला काहीतरी मिळाले, तरी मी माझ्या राज्याची प्रगती करीन. पंतप्रधानपदाबाबत चर्चा करण्यापेक्षा प्रत्येकाकडून काहीतरी चांगल्या गोष्टी घेणे गरजेचे आहे.
*आगामी सरकारचे काय ध्येय असावे?
जनतेला दिलेला विश्वास कधीही ढळू देऊ नका, हे सत्तेवर येणाऱ्या सरकारचे प्रथम ध्येय पाहिजे. जनतेसाठी योग्य धोरणे ठरवून त्याचा अवलंब करण्याचा प्रयत्न करावा.
*हिंदू राष्ट्रवादी नेते की व्यापारी वृत्ती असलेले मुख्यमंत्री – मोदींचे खरे रूप कोणते, हे जनतेला जाणून घ्यायचे आहे?
मी राष्ट्रवादी आहे, मी देशभक्त आहे. यात काहीही चुकीचे नाही. मी हिंदू धर्मात जन्माला आलो. त्यामुळे मी हिंदू राष्ट्रवादी आहे. तुम्ही मला हिंदू राष्ट्रवादी म्हणू शकता. त्याशिवाय जनतेने प्रगतिशील, विकासोन्मुख यापैकी काहीही म्हणू दे. हिंदू राष्ट्रवाद आणि या गुणांची ते तुलना करू शकत नाहीत. हे सर्व एकच गुण आहेत.
(‘रॉयटर्स’च्या सौजन्याने)