पुढील महिन्यात रशियामध्ये होणाऱ्या शांघाय सहकारी शिखर परिषदेच्या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याची शक्यता आहे. मोदी यांनी मंगळवारी शरीफ यांना फोनवर रमजानच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
म्यानमार कारवाईवरून पाक व भारतादरम्यान निर्माण झालेल्या तणावावर यावेळी चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या भेटीसाठी दोन्ही देशांकडून कोणतेही संकेत देण्यात आले नाहीत. रमजानच्या शुभेच्छा देतेवेळी मोदी यांनी मच्छीमारांच्या प्रश्नावर शरीफ यांचे लक्ष वेधले होते. यावेळी शरीफ यांनी वाटाघाटीतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.
९ व १०  जुलैला होणाऱ्या बैठकीवेळी दोन्ही देश या परिषदेच्या कायमच्या सदस्यत्वासाठी दावा करणार आहेत. भारताने यासाठी आधीच अर्ज दाखल केला आहे. या परिषदेची स्थापना २००१ मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. यामध्ये रशिया, चीन, कझाकिस्तान,  ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तानला सदस्यत्व मिळाले होते.

Story img Loader