संयुक्त राष्ट्रांच्या बहुराष्ट्रीय परिषदेत प्रत्यक्ष भेट होण्याची दाट शक्यता
संयुक्त राष्ट्रांचे ७० वे अधिवेशन याच आठवडय़ात येथे होत असून त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे येथील एकाच हॉटेलात वास्तव्य करणार आहेत. यामुळे उभय नेते परस्परांना भेटण्यासंबंधी तर्काना उधाण आले आहे.
नरेंद्र मोदी हे बुधवारी सायंकाळी येथे येत असून वॉल्ड्रॉफ अ‍ॅस्टोरिया हॉटेलात त्यांचे वास्तव्य असेल. तर नवाझ शरीफ हे २५ सप्टेंबर रोजी येत असून त्यांचेही वास्तव्य याच हॉटेलात असेल, असे सूत्रांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिकेचे अध्यक्ष न्यूयॉर्कमध्ये येतात, तेव्हा त्यांचे वास्तव्य याच हॉटेलमध्ये असते.
मोदी व शरीफ हे एकाच हॉटेलात वास्तव्यासाठी असल्यामुळे त्यांच्यात अधिकृतरीत्या द्विपक्षीय चर्चा होणार की नाही, यासंबंधी सरकारी स्तरावर घोषणा झालेली नाही.
मोदी यांचे भाषण
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी २५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या विकास परिषदेत नरेंद्र मोदी हे भाषण करणार आहेत. नवाझ शरीफ हे २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत भाषण करतील.
२६ व २७ सप्टेंबर रोजी मोदी यांचा कॅलिफोर्नियात मुक्काम असेल. तेथून ते २८ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कला येतील. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीखेरीज संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ते उच्चस्तरीय शांतता परिषदेत भाषण करतील. या परिषदेला शरीफ हेही उपस्थित राहणार असल्यामुळे या बहुराष्ट्रीय परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे हे नेते समोरासमोर येतील.
शांतता परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस तसेच बराक ओबामा यांचीही भाषणे होतील.
शांतीपथकात भारताचा मोठा सहभाग
संयुक्त राष्ट्रांच्या शांतिपथकात भारताचे सर्वाधिक योगदान असून आतापर्यंत त्यामध्ये एक लाख ८० हजार भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला आहे. या शांतिपथकात पाकिस्तानी सैन्याचाही सहभाग आहे.
नरेंद्र मोदी हे २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा भारताकडे प्रयाण करतील तर शरीफ यांचा मुक्काम न्यूयॉर्कमध्येच असेल.

Story img Loader