संसदेत भूसंपादन विधेयक संमत करून घेण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आज जाहीर सभेत मात्र आक्रमक राग आळवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फटकारले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अण्णांवर मोदींनी आज अप्रत्यक्षपणे टीका केली.
मोदी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा येथे सिंगाजी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी बोलताना मोदी यांनी अप्रत्यक्षपणे हजारे यांच्यावर शरसंधान केले. महात्मा गांधी लोकांना दररोज आंदोलन करा, असे म्हणत नसत. देशभक्तीची त्यांची पध्दत साधी आणि सरळ होती. सूत कातणे आणि जनसेवा करणे, याला ते देशभक्ती म्हणत असत, अशा शब्दात मोदी यांनी अण्णांचा उल्लेख न करता त्यांना टोला लगावला.
यावेळी पुढे बोलताना मोदी यांनी कॉंग्रेसवरही टीकास्त्र सोडले. मुळात हा कायदा संपुआ सरकारच्या काळात आला होता व ते सरकार हा कायदा घेऊनच निवडणुकांना सामोरे गेले होते. मात्र, जनेतेने त्यांना नाकारले. या विधेयकात आम्ही चांगल्या तरतुदी केल्या आहेत. आता, लोकांनीच या कायद्याला पाठिंबा द्यावा व संसदेत तो संमत व्हावा, याकरिता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
देशात भूसंपादन वटहुकूमावरून निर्माण झालेल्या वादाबद्दल मोदी म्हणाले की, आधीच्या सरकारने विकासात अडसर निर्माण करणारे कायदे केले. आता आमचे सरकार ते दूर करीत असताना काही लोक शेतकऱ्यांना भडकवत आहेत. शाळा आणि रुग्णालयांसाठीही जमीन संपादित करता येऊ नये, असे काही नियम अन् कायदे आधीच्या सरकारने केले होते. शाळा, रुग्णालये, कालवे, रस्ते, कारखाने यांच्यामुळेच विकास होतो, पण जमीन मिळणार नसेल ते उभारायचे कुठे, असा सवालही त्यांनी केला.
‘आम्ही गरिबांच्या विरोधात नाहीत. त्यांना घर, रस्ते, रुग्णालय, शाळा, पाणी, वीज आणि सिंचन सुविधांची आवश्यकता आहे, पण आधीच्या कायद्यात याबाबत काहीच तरतूद नाही. आधीच्या सरकारने रुग्णालय, रस्ते, शाळा आणि घरांसाठी जमीन देण्यास नकार दिला होता. आम्ही त्यात सुधारणा घडवू इच्छितो, असे मोदी म्हणाले.
राज्यसभेत भूसंपादन विधेयक संमत होऊ न शकल्याने मोदी यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जनतेच्या हिताची विधेयकेसंमत करण्यात अडचणी येत आहेत. आता आम्हाला जनतेने मदत करावी, असेही पंतप्रधान म्हणाले.
भूसंपादन विधेयकावरून मोदींनी अण्णांना फटकारले
संसदेत भूसंपादन विधेयक संमत करून घेण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आज जाहीर सभेत मात्र आक्रमक राग आळवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फटकारले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-03-2015 at 12:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi slams anna hazare over land acquisition