भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेस दुहीचे राजकारण खेळत आहे. या वाळवीपासून देशाला मुक्त करून विकासाच्या मार्गावर नेण्याची गरज असल्याचे  सांगत त्यांनी सपा आणि बसपावरही चौफेर हल्ला केला.
काँग्रेसचे वर्तन उद्दामपणाचे आहे, लोकांची त्यांना चिंता नाही. देशाची प्रगती व्हावी, चित्र बदलावे अशी इच्छाही त्यांना नाही. केवळ मतपेढीचे राजकारण करण्यामध्ये त्यांना रस असल्याचा आरोप मोदींनी केला. ७५ टक्के लोकांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोदींनी केला. फूट पाडून राज्य करण्यात त्यांना रस आहे. समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यात मतपेटीच्या राजकारणाची चढाओढ सुरू असल्याचा आरोप मोदींनी केला. या राजकारणापायी देशाचे वाटोळे झाल्याची टीका मोदींनी केली.  विकासाच्या मार्गावरून जाण्याची गरज आहे. भाजप विकासाचे राजकारण करते, असा दावा मोदींनी केला. मतपेढीच्या राजकारणापलीकडे जाऊन भाजप विकास करू इच्छिते असे मोदींनी सांगितले.
मुजफ्फरनगरमध्ये जातीय दंगे पसरवण्याचा आरोप असलेले भाजप आमदार संगीत सिंह सोम आणि सुरेश राणा यांचा नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी सत्कार केल्याने वाद सुरू झाला आहे. दोन्ही आमदार सध्या जामिनावर आहेत.
हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सोम आणि राणा या दोघांना सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. तसेच सोम यांच्यावर भावना भडकावणारी चित्रफीत सोशल नेटवर्किंग साइटवर टाकल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश सरकारने त्या दोघांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई केली. मात्र नोव्हेंबरमध्ये ही कारवाई मागे घेण्यात आली. सोम मेरठ जिल्ह्य़ातील सरधनाचे आमदार आहेत, तर राणा हे शामली जिल्ह्य़ातील ठाणा भवन मतदारसंघाचे आमदार आहेत. राणा आणि इतर कार्यकर्त्यांच्या विरोधात बुधवारी हिंसाचार आणि दंग्यांना प्रोत्साहन दिल्यावरून आरोपपत्र दाखल करण्यात आले. भाजपवर विरोधकांनी जोरदार टीका केली. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने जातीय राजकारणाचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा