मुझफ्फरनगर दंगलींमागे ‘आयएसआय’चा हात असून त्यांनी येथील काही मुस्लिम तरुणांना हाताशी धरून त्या घडविल्या होत्या, या राहुल गांधी यांच्या विधानाचा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झाशी येथील प्रचारसभेत खरपूस समाचार घेतला. त्या हस्तकांची नावे जाहीर करा, नाही तर विस्थापितांच्या छावणीत आश्रयास असलेल्या तरुणांची माफी मागा, असे ठणकावत मोदी यांनी मुस्लीम समाजाच्या जखमेवर फुंकर घातली. तसेच आजीची हत्या केल्याबद्दल शीख समाजाविषयी माझ्या मनात राग होता, या राहुल यांच्या विधानाचाही समाचार घेताना, काँग्रेसजनांच्या मनातही राग होता म्हणूनच शीखविरोधी दंगली घडल्या, याचीच ही कबुली आहे का, असा सवालही मोदी यांनी केला.
मी येथे माझी आसवे गाळण्यासाठी नव्हे, तर अश्रू पुसण्यासाठी आलो आहे, अशी सुरुवात करीत मोदी यांनी राहुल यांच्यावर थेट निशाणा धरला. राहुल यांनी आपल्या सभेत गुप्तचर संस्थेने माहिती दिल्याचा दावा केला होता. त्याला जोरदार आक्षेप घेताना मोदी म्हणाले, गुप्तचर संस्था एका खासदाराला गोपनीय माहिती कोणत्या आधारावर देतात? त्याउपर जर ही माहिती आहे तर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला रोखण्याची धमक काँग्रेसमध्ये का नाही?
राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या होत्या की, मैं मेरी झाशी नही दूँगी, तर मी तुम्हाला सांगतो ये देश हम बेइमानो को नही देंगे, या वाक्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुस्लीम, शीख, मागास वर्गाच्या भावनांना हात
’मुजफ्फरनगर दंगली तेथीलच काही तरुणांनी आयएसआयच्या इशाऱ्यावरून घडविल्या, या राहुल यांच्या विधानाची चिरफाड करीत तरुणांची नावे जाहीर करा, नाही तर त्या समुदायाची माफी मागा, असे बजावत मोदी यांनी मुस्लीम समाजाला जवळ केले. शीखविरोधी वक्तव्यावरून दिल्लीतील शीखविरोधी दंगलींची आठवण काढत शीखांच्याही भावनांना हात घातला. तसेच माझ्यासारख्या मागास समाजातल्या मुलाला पक्षाने पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली, असे सांगत मागास वर्गाच्या भावनांनाही हात घातला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi slams rahul asks did your party in anger kill sikhs in
Show comments