पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून बाहेर पडलेले नाहीत. त्यांचा कारभार अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसारखाच आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केली.
मोदींमध्ये फरक झालाय तो इतकाच की, ते आता गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून देशाचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी कारभार पंतप्रधानांसारखा केला पाहिजे पण अजूनही त्यांचे वर्तन मुख्यमंत्र्यांसारखेच आहे. गुजरातमध्ये ते निर्णय घ्यायचे त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयाकडून आता निर्णय घेतले जातात. राज्यात तुम्ही असा कारभार करू शकता पण देशात नाही. पंतप्रधान मोदी स्वत:भोवती केंद्रित असे सरकार चालवत आहेत. हा असाच कारभार फार काळ चालू शकणार नाही. हे मी एकटाच बोलत नसून, प्रत्येक जण हीच गोष्ट बोलत आहे असे चिदम्बरम म्हणाले.
तत्कालीन काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर चालत होते, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप चिदम्बरम यांनी खोडून काढला.
सोनिया गांधी यांनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचे एक उदाहरण त्यांना दाखवता येणार नाही. त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे चिदम्बरम यांनी सांगितले.
मोदींचा कारभार अजूनही मुख्यमंत्र्यांसारखाच!
मोदींमध्ये फरक झालाय तो इतकाच की, ते आता गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून देशाचे मुख्यमंत्री झाले आहेत.
First published on: 29-05-2015 at 02:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi still functioning like cm chidambaram