उनाऊमधील किल्ल्याखाली एक हजार टन सोनं दडल्याचा साक्षात्कार झालेल्या शोभन सरकार यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका करणाऱया भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घुमजाव केले. शोभन सरकार यांच्या तपस्येला आणि त्यागाला माझा सलाम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 
संत शोभन सरकार यांच्यावर अनेक वर्षांपासून लाखो लोकांची श्रद्धा आहे. मी त्यांच्या तपस्येला आणि त्यागाला सलाम करतो, असे मोदी यांनी ट्विटरवरील ट्विटमध्ये म्हटले आहे. चेन्नईमध्ये गेल्या शुक्रवारी जाहीर सभेत उनाऊमध्ये पुरातत्त्व खात्याकडून करण्यात येत असलेल्या उत्खननावर त्यांनी टीका केली होती. एक साधूच्या सांगण्यावरून पुरातत्त्व खाते उत्खनन करीत असल्यामुळे संपूर्ण जग आपल्याकडे बघून हसतंय, असे मोदी यांनी म्हटले होते. त्यानंतर शोभन सरकार यांनी मोदी यांना पत्र लिहून त्यांच्या या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते. या पत्राच्याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी सोमवारी घुमजाव करीत शोभन सरकार यांची स्तुती केली.
परदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्यावरही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, परदेशातील काळ्या पैशाबद्दल श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून देशातील जनतेला माहिती द्यावी, अशी आग्रह आपण केंद्र सरकारकडे करतो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi takes a u turn after mocking gold hunt praises seer shobhan sarkar
Show comments