नवी दिल्ली : G20 Summit Delhi 2023 जी-२० शिखर परिषदेची सांगता झाल्यानंतर भारत मंडपमच्या आंतरराष्ट्रीय माध्यम केंद्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धावती भेट दिली. सुमारे दोन तास मोदींची वाट पाहात ताटकळत असलेल्या तीन हजार पत्रकारांचे त्यांनी उभ्या-उभ्या आभार मानले! ‘जी-२०च्या शिखर परिषदेचे चांगल्या रितीने वृत्तांकन केल्याबद्दल आपले सर्वाचे धन्यवाद’, असे मोदी तमाम पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
मोदींची ही भेट इतकी वेगवान होती की, प्रसारमाध्यमांना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळाला नाही. माध्यम केंद्रामध्ये मोदींसाठी वेगळी आसनव्यवस्थाही केली होती. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी व समाजमाध्यम क्षेत्रातील प्रसारमाध्यमांशी त्यांना संवाद साधण्यासाठी वेळ देता आला नाही! जी-२०च्या शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर फ्रान्स, तुर्कस्तान आदी काही राष्ट्रप्रमुखांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामुळे मोदींच्या आंतरराष्ट्रीय माध्यम केंद्रातील भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
जी-२० च्या शिखर परिषदेच्या वृत्तांकन करण्यासाठी देशातून तसेच, परदेशांतून सुमारे तीन हजार पत्रकार प्रगती मैदानवरील आंतरराष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये तीन दिवस जमलेले होते. इथे असलेल्या पाच क्रमांकाच्या भल्या मोठय़ा सभागृहामध्ये वृत्तांकनासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. रविवारी शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी द्विपक्षीय बैठका संपल्यानंतर मोदी पत्रकारांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले. दुपारी चार वाजल्यापासून मोदींच्या संभाव्य भेटीचे कुतुहल देशाच नव्हे तर विदेशी पत्रकारांमध्ये निर्माण झाले होते. देशाचे पंतप्रधान प्रसारमाध्यमांना आपणहून भेटीला येणार असल्यामुळे पत्रकारांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसत होते.
आंतरराष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये मोदींसाठी दुपारी चार वाजल्यापासून मोदींच्या सुरक्षेची चोख काळजी घेण्यात आली होती. त्यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्थाही करण्यात आली होती. मोदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचतील असे सांगण्यात आले होते. मात्र, मोदी साडेसात वाजला पत्रकारांना भेटण्यासाठी आले. मोदींनी पत्रकारांचे वृत्तांकन केल्याबद्दल आभार मानले व ते पाच मिनिटात माध्यम केंद्रातून बाहेर पडले. मोदींच्या या धावत्या भेटीत पत्रकारांना पंतप्रधानांशी संवाद साधता आला नाही. पण, मोदी माध्यम केंद्रातून बाहेर पडताच अनेक पत्रकारांनी मोदींचे छायाचित्र काढण्यासाठी सभागृहाबाहेर धाव घेतली!