‘‘जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘अ‍ॅपल’, ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गुगल’ या कंपन्यांचा दबदबा आहे. नवभारत निर्माण करण्यासाठी आपल्या देशातही यांसारख्या तंत्रकंपन्या निर्माण करण्यासाठी युवा पिढीने प्रयत्न करावे,’’ असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आणि तंत्रकौशल्य निर्माण करून हे लक्ष्य पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.
चेन्नई येथील एसआरएम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोदी यांनी तंत्रशिक्षणाचे महत्त्व विषद केले. नवभारत निर्माण करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल, असा सवाल विचारून मोदी म्हणाले, ‘‘भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट असली तरी तुम्ही नाडेला यांच्यापेक्षाही उंच उडी घेतली पाहिजे.’’
‘‘आपल्या देशातही बडय़ा तंत्रकंपन्या निर्माण झाल्या पाहिजे. आपल्याकडेही ‘मायक्रोसॉफ्ट’ निर्माण झाले पाहिजे, आपल्याकडे ‘अ‍ॅपल’ निर्माण झाले पाहिजे, आपल्याकडे ‘गूगल’ निर्माण झाले पाहिजे. देशाच्या विकासासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत,’’ असे मोदी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याला ६५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली असतानाही आपण शिक्षण क्षेत्रात पिछाडीवर असल्याचेच चित्र आहे. शिक्षणावर आपण प्रकाशझोत टाकू शकलो नाही, हे देशाचे दुर्दैव! शिक्षणच नाही, तर देशाचा आर्थिक विकासावरही आपण भर न दिल्याने राष्ट्रनिर्माण करण्यात अपयशी ठरलो, असे मोदी यांनी सांगितले. भारतातील ६५ टक्के जनता ३५ वर्षांखालील वयोगटातील आहे. या युवापिढीच्या शैक्षणिक विकासावर भर दिला पाहिजे. शिक्षण आणि राष्ट्रनिर्माण यांच्यात सेतू बांधण्याचे काम ज्ञान करते. मात्र आपल्या देशातील ज्ञानावर कमी भर दिला जातो. आपल्या देशातील कोणत्याही विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत स्थान नाही.

Story img Loader